लाईट बिल जास्त आल्याने केली मीटर रिडींग घेणाऱ्याची हत्या; आरोपी रुग्णालयात दाखल

Electricity Bill Meter Reading: हे प्रकरण समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी आरोपीला बेदम मारहाण केली. गावकरी एवढे संतापले होते की या आरोपीची सुटका करण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. जखमी अवस्थेतील आरोपी सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 8, 2023, 11:05 AM IST
लाईट बिल जास्त आल्याने केली मीटर रिडींग घेणाऱ्याची हत्या; आरोपी रुग्णालयात दाखल title=
वीजेच्या मीटरचं रिडींग घेण्यावरुन झालेल्या वादातून घडला हा प्रकार

Electricity Bill Meter Reading: ओडिशामधील बेहरामपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वीजेच्या मीटरचं रिडींग घेणाऱ्या एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने हल्ला करुन हत्या करण्यात आलेल्या या व्यक्तीचं नाव लक्ष्मी नारायण त्रिपाठी असं असल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मी नारायण त्रिपाठी हे 52 वर्षांचे होते. वीजेच्या मीटरच्या रीडिंगवरुन त्यांचा आरोपी गोविंद सेठी (60) या इसमाबरोबर वाद झाला होता. दोघांमध्ये बाचाबाचीवरुन सुरु झालेला हा वाद हाणामारीवर पोहोचला आणि गोविंद यांनी लक्ष्मी नारायण यांची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती टाटा पॉवर साऊथ ओडिशा डिस्ट्रीब्यूशन कंपनी (TPSODL) मध्ये काम करत होती. ही व्यक्ती थेट कंपनीची कर्मचारी म्हणून कार्यरत नव्हती. या कंपनीने मीटर रीडिंगचं काम आऊटसोर्स केलं होतं. 

...म्हणून सुरु झाली बाचाबाची

हत्येची घटना तारासिंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कुपती गावात घडली. शेजारच्या गावात राहणारे लक्ष्मी नारायण हे मीटर रिडींग घेण्यासाठी कुपती गावात आले होते. याचवेळेस गोविंद यांच्या घराच्या मीटरचं रिडींग घेताना दोघांमध्ये वाद झाला. गोविंद यांनी रागाच्याभरात गोविंद यांनी लक्ष्मी नारायण यांच्यावर कुऱ्हाडीसारख्या हत्याराने वार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या पुतण्याने ते मागील अनेक महिन्यांपासून वाढीव वीजबिलामुळे चिंतेत होते असं म्हटलं आहे. लक्ष्मी नारायण यांनी गोविंद यांच्या पत्नीला वाढीव मीटर रिडींगसंदर्भात उद्धट उत्तर दिल्याने गोविंद यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केल्याचा दावा मृताच्या पुतण्याने केला आहे.

डिस्चार्ज मिळाल्यानंतर चौकशी

गंजमचे पोलीस निरिक्षक जगमोहन मीणा यांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात माहिती दिली. "स्थानिकांनी आरोपीला मारहाण केली. स्थानिक पोलिसांनी आरोपीला लोकांच्या तावडीतून वाचवलं. यानंतर जखमी आरोपीला एमकेसीजी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. आरोपीवर उपचार सुरु आहेत. प्राथमिक तपासामध्ये वीजेच्या मीटरच्या रिडींगवरुन दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. पण नेमकी या दोघांमध्ये काय बाचाबाची झाली हे समजलेलं नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल," असं मीणा यांनी सांगितलं आहे. गावातील इतर कोणी अशाप्रकारचा आक्षेप लक्ष्मी नारायण यांच्यासंदर्भात नोंदवला होता का? लक्ष्मी नारायण यांचं यापूर्वी गावात कोणाशी भांडणं झालं होतं का? मीटर रिडींगसंदर्भातील नेमकी अडचण काय आहे? यासारख्या प्रश्नांच्या आधारावर पोलीस सध्या तपास करत आहेत. गावकऱ्यांबरोबरच वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.