हिंदूत्ववादी सरकार, तरीही तोगडिया रडकुंडीला

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष नेते प्रवीण तोगडिया अखेर आज माध्यमांसमोर अवतरले. यावेळी त्यांना आपले अश्रू लपवता आले नाहीत

Updated: Jan 16, 2018, 07:34 PM IST
 हिंदूत्ववादी सरकार, तरीही तोगडिया रडकुंडीला title=

अहमदाबाद : गायब झाल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत सापडलेले विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष नेते प्रवीण तोगडिया अखेर आज माध्यमांसमोर अवतरले. आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप प्रवीण तोगडिया पत्रकार परिषदेत केलाय. मात्र, ते भितीच्या छायेखाली असल्याचे दिसून आले. दरम्यान, त्यांना आपले अश्रू लपवता आले नाहीत. देशात हिंदूत्ववादी सरकार असताना तोगडिया रडकुंडीला का आले, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून याचीच चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

भाजपला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न!

दरम्यान, तोगडियांचा गुजरात पोलिसांवर आक्षेप नसल्याचं सांगत भाजपला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न संघाचे माजी मुख्य प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी केलाय. षडयंत्र रचणाऱ्यांची नावं तोगडिया जाहीर करणार असल्यानं सत्य समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. 

एन्काऊन्टर होणार असल्याची बातमी 

आपलं एन्काऊन्टर होणार असल्याची बातमी कुणीतरी दिल्यामुळं आपण कार्यालयातून बाहेर पडलो आणि रिक्षातून विमानतळाकडं जात असताना आपल्याला चक्कर आली, असा दावा विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केला. 

 कोणीतरी अडचणीत आणत आहे?

आपल्यावरचे जुने खटले उकरून काढत कोणीतरी अडचणीत आणू पाहत असल्याचं तोगडिया म्हणाले. या पत्रकार परिषदेत भावूक झालेल्या तोगडियांना आपले अश्रू लपवता आले नाहीत. अहमदाबादमधून काल प्रवीण तोगडिया अचानक गायब झाले होते आणि त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत त्यांना अहमदाबादच्या चंद्रमणी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी ते शुद्धीवर आले. मात्र या प्रकणामुळं तोगडिया नेमका कुणाच्या निशाण्यावर आहेत आणि त्यांचा रोख कुणावर आहे याबाबत आता जोरदार चर्चा रंगलीय.