EPFO च्या नियमात आणखी एक बदल; या बदलाचा कोणाला होणार फायदा?

EPFO Rule change :  पीएफ खात्यासंदर्भातील प्रत्येक लहानमोठी अपडेट अनेकदा इतके बदल घडवून आणते की त्याचा नकळतच खातेधारकांवर परिणाम होताना दिसतो.   

सायली पाटील | Updated: May 21, 2024, 08:47 AM IST
EPFO च्या नियमात आणखी एक बदल; या बदलाचा कोणाला होणार फायदा? title=
epfo account holder death claim process nominee verification latest update new rule

EPFO Rule change :  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभाग, अर्थात EPFO कडून पीएप खातेधारकांना केंद्रस्थानी ठेवत सातत्यानं काही नियमांमध्ये सुधारणा आणि बदल करण्यात येतात. खातेधारकांना या खात्यात जमा होणाऱ्या निधीचा वापर गरजेच्या वेळी करता यावा आणि त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं आर्थिक बाबींची हमी मिळावी या दृष्टीनं पीएफ विभाग काम करत असतो. अशा या पीएफ खात्यासंदर्भातील एका नियमामध्ये बदल करण्यात आला असून, या बदलाचा थेट परिणाम खातेधारकांवर होताना दिसणार आहे. 

ईपीएफओनं 'डेथ क्लेम' (Death Claim) च्या नियमात बदल करत त्याबाबतची माहिती एका माहितीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. या नव्या नियमाअंतर्गत एखाद्या ईपीएफओ सदस्य/ खातेधारकाचं निधन झालं आणि त्यांचा आधार कार्ड क्रमांक पीएफ खात्याशी संलग्न नसेल, किंवा आधार कार्ड (Aadhaar Card) मध्ये देण्यात आलेली माहिती पीएफ खात्यातील माहितीशी जोडण्यात आली नसेल, तरीही त्या खात्यावर नॉमिनी म्हणून ज्या व्यक्तीचं नाव आहे त्यांना सदर मृत व्यक्तीच्या खात्यातील रक्कम दिली जाणार आहे. डेथ क्लेममध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आणि ही पद्धत खातेधारकांच्या दृष्टीनं अधिक सोपी करण्यासाठी म्हणून हा बदल करण्यात आला आहे. 

नव्या बदलाआधी कोणत्याही कारणास्तव आधार कार्ड निष्क्रीय असो किंवा त्यांध्ये एखादी चूक असल्यास पैसे मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पीएफ खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या आधार कार्डमध्ये असलेल्या तपशीलाशी मेळ साधणारे उल्लेख शोधण्यासाठी अधिकाऱ्यांना बरीच मेहनत करावी लागत होती. ज्यामुळं नॉमिनी असणाऱ्या व्यक्तींना आर्थिक मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागत होती. आता मात्र परिस्थिती बदलणार आहे, कारण ठरेल ते म्हणजे हा नवा नियम. 

हेसुद्धा वाचा : Weather News : मान्सून भारतात दाखल होताच बदललं चित्र; महाराष्ट्रातील हवामानावर 'असा' होतोय परिणाम

नव्या नियमानुसार एखादी व्यक्ती मृत्यूपश्तात आधार कार्डमध्ये असणाऱ्या तपशीलात सुधारणा करू शकत नाही. ज्यामुळं काही भौतिक पुराव्यांच्या आधारे त्या व्यक्तीच्या नॉमिनीला त्यांच्या खात्यातील रक्कम सुपूर्द करण्यात यावी. मात्र या प्रक्रियेमध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांची परवानगी गरजेची असेल. त्यांचं शिक्कामोर्तब आणि सही न झाल्यास ही रक्कम नॉमिनीला देता येणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोणतीही फसवणूक होणार नाही, यासाठीसुद्धा ईपीएफओ विभाग सतर्क राहणार आहे. उपलब्ध माहितीनुसार नॉमिनी म्हणून नाव असणारी आणि मृत व्यक्तीच्या पीएफ खात्यातील पैशांवर दावा सांगणारी व्यक्ती खातेधारताच्याच कुटुंबाची सदस्य आहे का इथपासून इतर काही पुराव्यांची पुन:पडताळणी करूनच इपीएफओकडून रक्कम पुढे दिली जाणार आहे. 

पीएफ खातेधारकाच्या आधार कार्डावरील माहितीमध्ये एखादी चूक असल्यासच हा नियम लागू असेल. पण, एखाद्या सदस्याची माहितीच ईपीएफओ यूएएनकडे नसेल, तर मात्र पैसे मिळवण्यासाठी दुसऱ्या पर्यायाचा अवलंब करावा लागणार आहे. या साऱ्या प्रक्रियेमध्ये आधार कार्ड महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळं त्यावरील तपशीलासंदर्भात आवश्यक गोष्टींची पूर्तता करावी असं आवाहन खातेधारकांना पीएफ विभागाकडून वारंवार करण्यात येतं.