नोकरदारांसाठी Good News! PF च्या व्याजदारात मोठी वाढ; 2023-24 साठी दर जाहीर

EPFO Interest Rate for 2023-24: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर निश्चित केला आहे. विशेष म्हणजे 3 वर्षांमधील सर्वाधिक व्याज यंदा मिळणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 10, 2024, 11:51 AM IST
नोकरदारांसाठी Good News! PF च्या व्याजदारात मोठी वाढ; 2023-24 साठी दर जाहीर title=
नोकरदांना मोठा दिलासा

EPFO Interest Rate for 2023-24: देशातील कोट्यवधी नोकरदारांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर निश्चित केला आहे. विशेष म्हणजे यंदा नोकरदारांना मागील 3 वर्षांतील सर्वाधिक व्याजदर मिळणार आहे. ईपीएफओने सन 2023-24 साठीच्या पीएफ ठेवींवर 8.25 टक्क्यांनी व्याज दिलं जाणार असल्याची घोषणा केली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. मागील वर्षी 28 मार्च रोजी ईपीएफओने सन 2022-23 साठी 8.15 टक्के दर जाहीर केला होता. 2021-22 रोजी हाच दर 8.10 टक्के इतका होता. निवडणुकीचं वर्ष असल्याने यंदा अधिक व्याद दिलं जात असल्याचं समजते.

कोणाचं किती योगदान?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा पगारार कर्मचाऱ्यांसाठीचं अनिवार्य योगदान आहे. याव्यतिरिक्त, नोकरी देणाऱ्या कंपन्यांकडूनही ईपीएफ खात्यात संबंधित योगदान देणे आवश्यक आहे. सरकारी सेवानिवृत्ती निधी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या ईपीएफओचे एकूण 6 कोटींहून अधझिक सदस्य आहेत. दर महिन्याला, कर्मचारी त्यांच्या कमाईच्या 12 टक्के रक्कम त्यांच्याच नावाने असलेल्या EPF खात्यात योगदान म्हणून देतात. नोकरी देणाऱ्या कंपन्या केवळ 3.67% ईपीएफ खात्यात जमा करतात, उर्वरित 8.33% रक्कम कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मधून वाटप केले जातात.

कसे दिले जाते हे व्याज?

EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाद्वारे EPF च्या व्याज दराचे दरवर्षी पुनरावलोकन केले जाते. वित्त मंत्रालयाशी सल्लामसलत केल्यानंतरच हा निर्णय घेतला जातो. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शिफारस केलेले दर विचारात घेऊन अंतिम व्याज दर अधिसूचित केले जातात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यावर दर महिन्याला ही रक्कम गोळा होते. मात्र संबंधित आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्च रोजी या खात्यावरील रक्कमेवर वर्षातून फक्त एकदाच व्याज मिळते. जेव्हा EPFO ​​एखाद्या आर्थिक वर्षासाठी व्याजदर जाहीर करते आणि वर्ष संपते, तेव्हा प्रत्येक महिन्याच्या शेवटी खात्यावर किती पैसे होते यानुसार व्याज मोजले जाते. त्यानंतर वार्षिक स्तरावर व्याजदर मोजला जातो.

परवानगीशिवाय घोषणा नको

मागील वर्षी, 90,497.57 कोटी रुपयांचे निव्वळ उत्पन्न वितरित करण्याचे उद्दीष्ट होते. सभासदांच्या खात्यात व्याज जमा झाल्यानंतर 663.91 कोटी रुपयांच्या अधिशेषाचा अंदाज होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये, CBT ने 2023-24 चे व्याजदर वित्त मंत्रालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय जाहीर करू नयेत असे कामगार मंत्रालयाने सांगितले होते.

मोदी सरकारने कारभार हाती घेतल्यापासून कसा राहिला व्याजदर

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने 2014 साली देशाचा कारभार हाती घेतल्यापासून पीएफवरील व्याजदर 8.80 टक्के ते 8.10 टक्क्यांदरम्यान राहिला आहे. दरवर्षी व्याजदर किती होता ते पाहूयात...

2014-15 8.75% 
2015-16 8.80% 
2016-17 8.65% 
2017-18 8.55% 
2018-19 8.65% 
2019-20 8.50% 
2020-21 8.50% 
2021-22 8.10% 
2022-23 8.15% 
2023-24 8.25%