यूपी बार काऊन्सिलच्या पहिल्या महिला अध्यक्षची हत्या, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दरवेश यादव यांच्या हत्या प्रकरणात तीन जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलीय

Updated: Jun 13, 2019, 10:08 AM IST
यूपी बार काऊन्सिलच्या पहिल्या महिला अध्यक्षची हत्या, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल title=

आग्रा : उत्तर प्रदेश बार काऊन्सिलच्या अध्यक्ष दरवेश यादव यांची सहकारी वकिलानंच गोळया झाडून हत्या केलीय. आग्रा न्यायालयाच्या आवारात ही धक्कादायक घटना घडलीय. दोन दिवसांपूर्वीच दरवेश यांची बार काऊन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. अध्यक्षपदी निवड झाल्यानं दरवेश यादव यांच्या स्वागतासाठी आग्रा जिल्हा न्यायालयात कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांच्यावर गोळया झाडण्यात आल्या. मनिष असं हल्लेखोराचं नाव आहे. हल्लेखोरानं स्वत:वर देखील गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर आहे. पोलीस गोळीबाराच्या कारणांचा शोध घेत आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर या भागात तणाव वाढलाय. 

दरवेश यादव यांच्या हत्या प्रकरणात तीन जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलीय. दरवेश यांचा भाऊ पंजाब सिंह यादव यांचा मुलगा सनी यादव यानं ही एफआयआर दाखल केलीय. या एफआयआरमध्ये आरोपी आणि अधिवक्ता मनिष शर्मा, त्याची पत्नी वंदना शर्मा यांच्यावर दरवेशला धमकावण्याचा आरोप आहे. तिसरा आरोपी विनीत गुलेचा असल्याचं सांगण्यात येतंय. मनीषनं दरवेशवर गोळ्या झाडल्या तेव्हा विनित मनिषला स्कुटरवर घेऊन आला होता. तिघांविरुद्ध आयपीसी कलम ३०२, १२० बी आणि ५०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

दरवेश यादव यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केलीय. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'आरोपी मनिषनं बार काऊन्सिलच्या वकिलांच्या कल्याणासाठी येणारा पैसा लाटला. दरवेश यांची गाडीही घेतली होती, त्यामुळे त्याला काढून टाकण्यात आलं होतं... त्याचं स्वत:चं काहीही उत्पन्न नव्हतं'.

उल्लेखनीय म्हणजे यूपी बार काऊन्सिलच्या इतिहासात दरवेज यादव पहिली महिला अध्यक्ष बनल्या होत्या. यासाठी प्रयागराजमध्ये निवडणूकही पार पडली होती. दरवेश या मूळच्या एटाच्या रहिवासी होत्या.