भीषण अपघात! 4 सेकंदात 5 जण जागीच ठार; कार पलटी मारत 100 मीटर दूर दुचाकीस्वार जाऊन कोसळली

पोलिसांनी विरुद्धनगर-मदुराई हायवेवर झालेल्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज रिलीज केलं आहे. यामध्ये अपघात किती भीषण होता हे दिसत आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 10, 2024, 06:04 PM IST
भीषण अपघात! 4 सेकंदात 5 जण जागीच ठार; कार पलटी मारत 100 मीटर दूर दुचाकीस्वार जाऊन कोसळली title=

तामिळनाडूत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांनी जीव गमावला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. हायवेवरुन एसयुव्ही जात असताना हा अपघात झाला. कार दुभाजकावर आदळल्यानंतर पलटी मारत थेट हायवेच्या दुसऱ्या टोकापर्यंत गेली. पोलिसांनी या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आणलं आहे. हे सीसीटीव्ही पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. 

विरुद्धनगर-मदुराई हायवेवर हा अपघाता झाला असून, पोलिसांनी त्याचं सीसीटीव्ही फुटेज रिलीज केलं आहे. यामध्ये एसयुव्ही चालवणाऱ्या चालकाचं नियंत्रण सुटल्याचं दिसत आहे. गाडी भरधाव वेगात असताना ती डाव्या बाजूला असणाऱ्या दुभाजकावर आदळताना दिसत आहे. यानंतर ती आपल्यासमोर असणाऱ्या दुचाकीस्वाराला उडवते. नंतर पलटी मारत रस्त्याच्या दुसऱ्या कडेपर्यंत जाते. तिथेही दुचाकी पार्क करुन उभ्या असणाऱ्या एका तरुणाच्या अंगावर जाऊन कोसळते. पण सुदैवाने तो यातून थोडक्यात बचावतो.  

कारच्या समोर असणाऱ्या दुचाकीस्वाराला मृत्यू आपला पाठलाग करत असल्याची थोडीही कल्पना नव्हती. धीम्या वेगात निघालेल्या दुचाकीस्वाराला कारने धडक दिल्यानंतर तो अक्षरश: हवेत उडतो आणि नंतर 100 मीटरपर्यंत फरफटत जातो. दुसरीकडे कारही दुभाजकाला धडकल्याने पलटी मारत जाते. 

या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून, 4 जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मदुराई जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.