नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर

प्रवाशांच्या गरजा लक्षात घेत आयआरसीटीसीतर्फे पुरवली जाणार महत्त्वाची सेवा 

Updated: Oct 2, 2019, 01:18 PM IST
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर  title=
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रेल्वे प्रवाशांना खुशखबर

मुंबई : सध्या सुरु असणारं नवरात्रोत्सवाचं पर्व आणि  व्रतवैकल्यांचे दिवस पाहता भारतीय रेल्वेकडूनही एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या निर्णयामुळे आता प्रवासादरम्यान उपवास आसणाऱ्यांना त्यांच्यासाठीच्या वेगळ्या, उपवासाच्या खाद्यपदार्थांची चिंता करावी लागणार नाही. कारण, आयआरसीटीसीकडून ठराविक स्थानकांवर ई- केटरिंग या सेवेअंतर्गत प्रवाशांपर्यंत उपवासाचे खाद्यपदार्थ अर्थात 'व्रत का खाना' पोहोचवण्यात येणार आहे. 

नवरात्रोत्सवाच्या या पर्वात मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे उपवास सुरु असतात ही बाब लक्षात घेत नऊ दिवस चालणाऱ्या या वातावरणामध्ये प्रवाशांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी हा स्तुत्य निर्णय घेतला गेला आहे.  

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत उपवासाचं महत्त्वं लक्षात घेत साबुदाणा, सेंधव मीठ, शिंगाड्याचं पीठ आणि उपवासाला सेवन करता येणाऱ्या ठराविक भाज्या यांचा वापर करत पदार्थ तयार करण्यात येत आहेत. यामध्ये साबुदाणा खिचडी, सुके मखाणे, शेंगदाणे, नमकीन, आलू टीक्की, नवरात्री थाली, जीरा आलू, फ्रेंच फ्राईस, फलाहारी चिवडा, मलाई बर्फी, रसमलाई, दूध, मिल्क केक, लस्सी, दही आणि इतरही काही पदार्थांचा समावेश आहे. 

आयआरसीटीसीक़डून पुरवण्यात आलेल्या 'व्रत का खाना'ची ही सुविधा भारतीय रेल्वेअंतर्गत येणाऱ्या ठराविक स्थानकांतील हॉटेलांची निवड करुन उपभोगता येणार आहे. निवडक स्थानकांच्या या यादीत कानपूर सेंट्रल, जबलपूर, रतलाम, जयपूर, बिना, पाटना, राजेंद्र नगर, हजरत निजामुद्दीन, अंबाला, झाँसी, औरंगाबाद, अकोला, इतरासी, वसई रोड, वापी, कल्याण, बोरिवली, दुर्ग, दौंड, ग्वाल्हेर, मथुरा, नागपूर, भोपाळ, उज्जैन आणि अहमदनगरचा समावेश आहे. 

आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन किंवा "Food-on-track" या अॅपच्या माध्यमातून या खाद्यपदार्थांची ऑर्डर देता येणार आहे. प्रवास सुरु होण्यापूर्वी कमीत कमी दोन तासांपूर्वी प्रवासी त्यांच्या खाण्याची ऑर्डर देऊ शकतात. त्यासाठी त्यांना पीएनआर क्रमांक वापरावा लागणार आहे. ही ऑर्डर करतेवेळी पैसे कोणत्या प्रकारे दिले जाणार आहेत यासाठीचे पर्यायही प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.