सुरक्षेला चकवा देत थेट UAE च्या अध्यक्षांना भेटायला गेलेली ती व्यक्ती कोण? यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या अन्...

G20 Summit : जी 20 शिखर परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा झाल्याचे समोर आलं आहे. सौदी अरेबियावरुन युएईच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणाला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 11, 2023, 08:55 AM IST
सुरक्षेला चकवा देत थेट UAE च्या अध्यक्षांना भेटायला गेलेली ती व्यक्ती कोण? यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या अन्... title=
(फोटो सौजन्य - PTI)

G20 Summit Delhi 2023 : जी 20 शिखर परिषदेसाठी (G20 Summit) भारतात आलेल्या 40 देशांच्या प्रतिनिधींसाठी राजधानी दिल्लीत (Delhi) मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती. बड्या राष्ट्राच्या प्रमुख व्यक्ती भारतात येत असल्याने अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. दोन दिवस नवी दिल्लीला लष्करी छावणीचं स्वरुप प्रात्प झालं होतं. मात्र इतकी चोख सुरक्षा व्यवस्था करुनही त्यामध्ये काही चुका आढळून आल्या आहेत. आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि आता युएईचे  (UAE)राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान (Sheikh Mohamed Bin Zayed Al Nahyan) यांच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याचे समोर आले आहे.

दिल्लीत जी-20 परिषदेत सहभागी झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यानंतर संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले आहे. सौदी अरेबियातील एक तरुण युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांना भेटण्यासाठी थेट ते थांबलेल्या ताज मान सिंग हॉटेलमध्ये पोहोचला होता. बराच वेळ लॉबीत वाट पाहिल्यानंतर शेख मोहम्मद आल्यानंतर हा तरुण त्यांना भेटायला गेला. हे पाहून यूएईच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. चौकशीदरम्यान तो सौदीतून आल्यानंतर दिल्लीतील एरोसिटी येथील हॉटेलमध्ये राहत होता. महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्राध्यक्षांची भेट घेण्यासाठी त्याने जी-20 परिषदेशी संबंधित पास असलेली हॉटेल कार आणली होती. तुघलक रोड पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याला सोडून दिले.

लाईव्ह हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, हा व्यक्ती सौदी अरेबियातून दिल्लीत आला होती आणि एरोसिटीच्या हॉटेल पुलमनमध्ये राहत होती. त्या हॉटेलमध्ये अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्षही मुक्कामी होते. सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन हॉटेलच्या सर्व वाहनांवर विशेष पास लावण्यात आले होते. जेणेकरून त्या गाड्यांव्यतिरिक्त दुसरी वाहने हॉटेलमध्ये प्रवेश करु शकणार नाहीत. त्यानंतर या तरुणाने हॉटेल पुलमनकडे कार मागितली. त्या तरुणाला दिलेल्या वाहनाकडे हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठी पास होता. त्यानंतर ते नवी दिल्लीतील हॉटेल ताजमान सिंह येथे पोहोचले. गाडीवर पास असल्याने त्यांना वाटेत थांबवण्यात आले नाही.

कडेकोट बंदोबस्त असतानाही तो तरुण थेट हॉटेलमध्ये घुसला. तिथे असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही त्याची चौकशी केली नाही. हॉटेलच्या लॉबीत बसून तो युएईच्या राष्ट्राध्यक्षांची वाट पाहू लागला. काही वेळाने राष्ट्राध्यक्ष सुरक्षा कर्मचार्‍यांसह बाहेर पडू लागले तेव्हा तो माणूस त्यांच्या दिशेने वेगाने जाऊ लागला. त्यावेळी युएईच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवले. तरुणाकडे चौकशी केली असता तो सौदी अरेबियाचा रहिवासी असल्याचे समोर आले. त्याचा भाऊ आजारी आहे आणि म्हणून तो यूएईच्या राष्ट्राध्यक्षांची मदत घेण्यासाठी आला होता.

दरम्यान, जी-20 परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांच्या ताफ्यात भारतातून काही गाडी देण्यात आल्या होत्या. त्या गाड्यांवर खास पासेस लावण्यात आले होते. त्यामुळे या गाड्यांना हे पाहुणे जिथे थांबले होते तिथे पोहोचता येत होतं. बायडेन यांच्या ताफ्यातील कारदेखील एका प्रवाशाला घेऊन या हॉटेलवर पोहोचली होती. मात्र सुरक्षा रक्षकांनी सतर्कता दाखवल्यामुळे ती कार बायडेन यांच्या ताफ्यातील असल्याचे उघड झालं होतं.