गँगस्टर लंडा हरिकेने घेतली शिवसेना नेत्यावरील हल्ल्याची जबाबदारी, फेसबुक पोस्टने खळबळ

ज्यांनी सुरक्षा घेतलीय त्यांचीही वेळ येणार आहे, असेही या पोस्टमध्ये म्हटलं आहे

Updated: Nov 5, 2022, 11:13 AM IST
गँगस्टर लंडा हरिकेने घेतली शिवसेना नेत्यावरील हल्ल्याची जबाबदारी, फेसबुक पोस्टने खळबळ title=

शुक्रवारी पंजाबमधील (Punjab) अमृतसरमध्ये (amritsar) शिवसेना (Shivsena) नेते सुधीर सुरी (sudhir suri) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत सुधीर सुरी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर सुरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता मृत घोषित केलं. अमृतसर येथील गोपाळ मंदिराच्या (Gopal Mandir) बाहेर कचऱ्याजवळ देव देवतांच्या मुर्ती सापडल्या होत्या. यावरून मंदिराच्याच बाहेर सुधीर सुरी (sudhir suri) कार्यकर्त्यांसह आंदोलनाला बसले होते. त्याचवेळी काही कळायच्या आता गर्दीतून एका व्यक्तीने सुधीर सुरींवर गोळीबार (firing) केला आणि पळ काढला. या घटनेत सुधीर सुरी गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Gangster Landa Harike took responsibility murder Punjab Shivsena leader Sudhir Suri)

ही तर फक्त सुरुवात...

शिवसेना नेते सुधीर सुरी (sudhir suri) यांच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर आणि दहशतवादी लंडा हरिकेने स्वीकारली आहे. फेसबुक (Facebook) पोस्टद्वारे या हत्येची जबाबदारी घेत हरिकेने ही फक्त सुरुवात असल्याचे म्हटलं आहे. ज्यांनी सुरक्षा घेतलीय आणि ज्यांना वाटतंय की ते वाचतील आता त्यांची पाळी आली आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र पोस्ट व्हायरल (Viral Post) झाल्यानंतर ती डिलीट करण्यात आली आहे. त्यामुळे ही पोस्ट खरी आहे की खोटी याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी (Punjab Police) याची दखल घेत तपास सुरु केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "ज्या आयपी अॅड्रेसवरून ही पोस्ट टाकण्यात आली आहे त्यावर सायबर सेल काम करत आहे. कारण पोस्ट टाकून स्क्रीनशॉट टाकला आहे आणि आता ती पोस्ट डिलीट करण्यात आली आहे."

कोणत्याही धर्माबद्दल वाईट बोलणाऱ्यांनी तयार राहावे

व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये आमच्या भावांनी सुरीला मारल्याचे म्हटले आहे. 'आज अमृतसरमध्ये सुधीर सुरी यांचा खून आमच्या भावांनी केला आहे आणि इतर जे कोणत्याही धर्माबद्दल वाईट बोलतात त्यांनीही तयार राहावे, सर्वांची पाळी येईल. सुरक्षा घेऊन तुम्ही वाचू शकाल असा विचार करू नका. आजपर्यंत जे बांधव आमच्या पाठीशी उभे आहेत त्यांच्यासोबत आम्ही चालणार आहोत,' असेही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

"कचऱ्याशेजारी मूर्ती सापडल्यानंतर सुरी हे त्यांच्या साथीदारांसह मंदिराबाहेर बसून आंदोलन करत होते. सुरी गोपाल मंदिराच्या व्यवस्थापनाविरोधात आंदोलन करत होते. सुरीं यांच्यावर पाचहून अधिक गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना रुग्णालयात नेत असता सुरी यांचा मृत्यू झाला. सुरींच्या हत्येतील आरोपी संदीप सिंग याला अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

खोटी माहिती पसरवू नका - पंजाब पोलीस

दरम्यना, हत्येमागचे कारण आणि या घटनेमागे सहभागी असलेल्यांचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. पोलिसांनी सांगितले की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि लोकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खोटी आणि अपूर्ण माहिती पसरवू नका, अन्यथा त्यांच्याविरुद्ध आयटी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.  या घटनेत खलिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना पंजाबचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव म्हणाले की, 'हा तपासाचा प्राथमिक टप्पा असून आम्ही सर्व गोष्टींच्या तळापर्यंत जाऊ. सुरींच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण दिले जाईल आणि शांतता आणि सलोखा राखण्याला पोलिसांचे प्राधान्य असणार आहे.'