समुद्रातलं सोनं! गुजरातने राज्य माशाचा दर्जा दिलेल्या माशाच्या किमतीत तुमची युरोप टूर होईल

Ghol Fish Gujarat State : महागड्या आणि दुर्मिळ घोळ माशाला नुकतेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचा राज्य मासा घोषित केले आहे. अहमदाबाद येथे आयोजित ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023 मध्ये भूपेंद्र पटेल यांनी ही घोषणा केली.

आकाश नेटके | Updated: Nov 24, 2023, 05:07 PM IST
समुद्रातलं सोनं! गुजरातने राज्य माशाचा दर्जा दिलेल्या माशाच्या किमतीत तुमची युरोप टूर होईल title=

Ghol Fish Gujarat State : मच्छीमारांची लॉटरी समजल्या जाणाऱ्या ‘घोळ’ माशाला गुजरात सरकारने नुकताच राज्य माशाचा दर्जा दिला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या ‘ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023’मध्ये घोळ माशाला गुजरातचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आलं. जगातील इतर देशांमध्ये‘ब्लॅक स्पॉटेड क्रोकर फिश’ म्हणून ओळखला जाणारा घोळ हा भारतातील सर्वात मोठा मासा आहे. आता मोठ्या माशाची किंमत देखीत तितकीच मोठी आहे.

घोळ मासा हा भारतातील सर्वात महागड्या माशांपैकी एक आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार या माशाची किंमत 5 लाख रुपयांपर्यंत आहे. किमतीव्यतिरिक्त काही विशेष गुणांमुळे घोळ माशाला गुजरातचा राज्य मासा घोषित करण्यात आला आहे. या माशाचा उपयोग औषध आणि दारू बनवण्यासाठी केला जातो. चीनमध्ये या माशांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत घोळला राज्य माशाचा दर्जा देण्यात आला. तेव्हापासूनच या माशाच्या किमतीची आणि वैशिष्टांची भरपूर चर्चा सुरु झाली.

घोळ माशाला त्याच्या बाजारातील किमतीमुळे ‘सी गोल्ड’ असेही म्हणतात. हा सागरी मासा हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागरात आढळतात. पण प्रदूषण आणि सातत्याने सुरु असलेल्या मासेमारीने हा मासा खोल समुद्रात जाऊन राहतो. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी खोल समुद्रात जावं लागतं. या माशाला पकडण्यसाठी मच्छिमारांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागतो. घोळ मासा हा त्याच्या पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांसाठी महत्त्वाचा आहे. फार्मास्युटिकल आणि कॉस्मेटिक उद्योगातही याची खूप मागणी आहे. तसेच वाइन आणि बिअरच्या उत्पादनात देखील त्याचा वापर केला जातो.

मच्छीमारांसाठी लॉटरी

अहवालानुसार, घोळ मासा सहजासहजी मिळत नाही. गुजरातचे मत्स्यव्यवसाय आयुक्त नितीन सांगवान यांच्या माहितीनुसार,  हा मासा नष्ट होण्यापासून वाचवण्याची गरज आहे. रिबन, पोमफ्रेट आणि बॉम्बे डक यासारख्या अनेक प्रजातींनाही राज्याच्या माशांच्या शर्यतीत नामांकन मिळाले होते. हा मासा महाग असल्याने स्थानिक पातळीवर याचा फारसा वापर होत नाही. पण चीन आणि इतर काही देशांमध्ये याला खूप मागणी आहे. घोळ मासा ही मच्छीमारांसाठी लॉटरीसारखी आहे. त्याची चवीचे अनेक देशांमध्ये खूप कौतुक केले जाते. हा मासा बहुतेक युरोप आणि मध्य पूर्व देशांमध्ये निर्यात केला जातो.

प्रत्येक भागाचा उपयोग

या माशाच्या जवळजवळ प्रत्येक भागाचा उपयोग केला जातो. ‘प्रोटोनिबिया डायकॅन्थस’ असे वैज्ञानिक नाव असलेल्या या माशाचा उपयोग विरघळणारे शस्त्रक्रिया टाके बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या धाग्यांसारख्या आवश्यक वस्तू बनवण्यासाठी केला जातो. याव्यतिरिक्त, माशांचे वायु मूत्राशय स्वतंत्रपणे विकले जातात कारण ते जगातील अनेक भागांमध्ये वाइनच्या उत्पादनात वापरले जाते.

किंमत किती?

गुजरातमध्ये एक किलो घोळ माशाची किंमत 5 हजार ते 15 हजार रुपये आहे. या माशाची सुकलेली मुत्राशय चढ्या भावाने विकली जातात. त्याची किंमत 25 हजार रुपयांपर्यंत जाते. या प्रजातीच्या माशाचे वजन 25 किलोपर्यंत असू शकते. त्यामुळे एका घोळ माशाची किंमत 5 लाखांपर्यंत पोहोचल्याचा दावा अनेक माध्यमांमध्ये करण्यात आला आहे.