पुढच्या तीन महिन्यांसाठी विमान प्रवासाचे हे दर

तिकीट बुकिंग आणि प्रवासासाठीही नवे नियम

Updated: May 21, 2020, 05:13 PM IST
पुढच्या तीन महिन्यांसाठी विमान प्रवासाचे हे दर title=

रामराजे शिंदे, नवी दिल्ली :  केंद्र सरकारने देशांतर्गत विमानसेवा २५ मे म्हणजे येत्या सोमवारपासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नवे दर आणि नियमावलीही जाहीर केली आहे. विमान कंपन्यांना नुकसान होऊ नये परंतु ग्राहकांची लूट होऊ नये याचा विचार करून विमानाचे तिकीट दर निश्चीत करण्यात आले आहेत.

दिल्ली-मुंबई दरम्यान ९० ते १२० मिनिट अंतरासाठी कमीत कमी ३५०० तर जास्तीत जास्त १० हजार रूपये तिकीट असणार आहे. हे दर पुढील ३ महिन्यांसाठी कायम राहणार असल्याची माहिती विमान उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांनी दिलीय.

असे असतील विमान प्रवासाचे नवे प्रवर्ग 

फ्लाईट मार्गाला ७ प्रवर्गात विभागले आहे.

१. ४० मिनिटांपेक्षा कमी अंतर

२. ४० ते ६० मिनिट

३. ६० ते ९० मिनिट

४. ९० ते १२० मिनिट

५. १५० ते १८० मिनिट

६. १८० ते २१० मिनिट

सर्वाधिक प्रवासाचे मार्ग

सर्वाधिक प्रवासी मुंबई-दिल्ली-चेन्नई आणि कोलकाता या मार्गावर आहेत. दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकाताचे सरासरी अंतर ९०-१२० दरम्यान आहे.

प्रवासासाठी नवे नियम

- आरोग्य सेतू ॲप्लीकेशनवर हिरवा रंग दाखवत असेल तर प्रवास करता येईल. लाल रंग दाखवला तर प्रवास करता येणार नाही. हिरवा रंगाचा अर्थ कोरोना झाला नाही तर लाल रंगांचा अर्थ कोरोना रूग्ण आहेत.

- विमानतळावर प्रवेश करण्यापूर्वी थर्मल स्क्रिनिंग होईल.

- फ्लाईटच्या वेळेपूर्वी साधारण २ तासाआगोदर विमानतळावर पोहोचावे लागेल.

- २० किलो पेक्षा जास्त सामान नसावे

- केबिनमध्ये सामान नेता येणार नाही

- प्रवाशांनी वेब चेक इन द्वारे तिकीट घ्यायचे आहे. प्रिंट केलेले तिकीट मिळणार नाही.

- प्रवाशांनी मास्क, ग्लोव्हज, शूज घालून खबरदारी घ्यावी

- विमान कर्मचा-यांनी मास्क, ग्लोव्हज, पीपीई किट घातले बंधनकारक आहे.

- वृद्ध, गर्भवती महिला, आजारी असलेले व्यक्ती आणि कंटेन्मेंट झोनमधील व्यक्तींना प्रवास करता येणार नाही.

देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्यासाठी सरकारने बुधवारी हिरवा कंदील दाखवल्यानंतर महत्वाच्या विमानतळांवर आता विमानउड्डानाची तयारी सुरु झाली आहे.