गुड न्युज: पेन्शनसाठी आता बॅंकेत खेटे घालण्याची गरज नाही

सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर पेन्शन मिळविण्यासाठी होणारी ससेहेलपट आता थांबणार आहे.

Updated: Aug 7, 2017, 10:28 AM IST
गुड न्युज: पेन्शनसाठी आता बॅंकेत खेटे घालण्याची गरज नाही title=

मुंबई: सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर पेन्शन मिळविण्यासाठी होणारी ससेहेलपट आता थांबणार आहे.

आतापर्यंत हक्काची पेन्शन मिळविण्यासाठीही ज्येष्ठांना अनेकवेळा बॅंकेच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. पण आता यामधून त्यांची सुटका होणार आहे. आयुष्यभर केलेल्या कामाची पुंजी पेन्शन स्वरुपात निवृत्तांना मिळत असते. पण या हक्काच्या पैशांसाठीही उतार वयात त्यांना बॅंकेच्या पायऱ्या चढाव्या लागतात. बँकेत वारंवार खेटे घालूनही पेन्शन सुरू होत नसल्याने थकलेल्या ज्येष्ठांना ही आनंदाची बातमी आहे.

निवृत्तीच्या दिवशीच पेमेंट ऑर्डर

 आता निवृत्तीच्या दिवशीच संबंधिताला पेन्शन पेमेंट ऑर्डर देण्याचा निर्णय केंद्रीय कामगार मंत्रालयाने घेतला आहे. याचा निवृत्त होणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतर त्याच्या पेन्शन पेमेंट ऑर्डरची कॉपी संबंधित बँकेला पाठवली जाते. मात्र ऑर्डरची ही कॉपी गहाळ झाल्यास कर्मचाऱ्याला वारंवार बँकेत खेटे घालावे लागत आहेत. त्याबाबतच्या तक्रारीही कामगार मंत्रालयाकडे आल्या आहेत. त्यामुळेच नियमात बदल करण्यात आला आहे.

ससेहेलपट वाचणार

यापुढे निवृत्तीच्या दिवशी दिलेली पेन्शन पेमेंट ऑर्डर ऑर्डरची कॉपी कर्मचाऱ्याने बँकेत दाखवल्यानंतर त्याला पेन्शन सुरू केली जाणार आहे. त्यामुळे बॅंकेच्या फेऱ्या वाचणार आहेत. आतापर्यंत सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याची पेमेंट पेन्शन ऑर्डर बँकेत पाठवली जात आहे. पण ठराविक वेळेत बॅकेत न पोहोचल्याने गोंधळ निर्माण होतो. निवृत्तांना यासंबधी माहिती मिळत नाही त्यामुळे ते वारंवार बॅंकेत येऊन पेन्शन जमा झाली का अशी चौकशी करतात. बऱ्याचदा त्यांना बॅंक कर्मचाऱ्यां रोषाला सामोरे जावे लागते.