'या' जागांवर अवघ्या काही मतांनी मिळाला भाजप-काँग्रेसला विजय

या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजपला जोरदार टक्कर दिल्याचं पहायला मिळालं.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 18, 2017, 10:02 PM IST
'या' जागांवर अवघ्या काही मतांनी मिळाला भाजप-काँग्रेसला विजय title=

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत भलेही भाजपने विजय मिळवत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बहूमताचा आकडा पार केला असेल. पण, या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजपला जोरदार टक्कर दिल्याचं पहायला मिळालं.

एकूण १८२ जागांच्या विधानसभा मतदारसंघापैकी अशा काही जागा आहेत ज्या ठिकाणी अवघ्या काही मतांनीच काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचं पहायला मिळालं. 

केवळ २०० मतांच्या फरकाने पराभव

गुजरातमध्ये १६ जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाल्याचं पहायला मिळालं. काही जागांवर तर विजय-पराभवात केवळ २०० मतांचंच अंतर होतं.

अपक्ष उमेदवारांमुळे पराभव?

धोलका आणि फतेपुरा सारख्या जागांवर एनसीपी आणि बीएसपीसारख्या लहान पक्षांनी मतं घेत काँग्रेसकडून विजय खेचून घेतला. काही जागांवर अपक्ष उमेदवारांनी चांगली मतं आपल्या पदरात टाकून घेतली. अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी काँग्रेस किंवा भाजपची मतं खाल्ली.

केवळ १७० मतांनी विजय

डांग मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराने भाजप उमेदवारापेक्षा केवळ ७६८ मतांनी विजय मिळवला. तर, कपराडा मतदारसंघात काँग्रेसने केवळ १७० मतांनी विजय मिळवला.

२५८ मतांनी भाजप उमेदवाराचा विजय

गोध्रासोबतच इतर आठ मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला आपल्या विरोधी पक्षाच्या उमेदवारापेक्षा दोन हजारांहून कमी मतं मिळाली. गोध्रामध्ये भाजप उमेदवार केसीके राऊलजी यांनी केवळ २५८ मतांनी विजय मिळवला.

काँग्रेसच्या उमेदवाराचा केवळ ३२७ मतांनी पराभव

धोलका विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या उमेदवाराचा केवळ ३२७ मतांनी पराभव झाला. या जागेवर बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना क्रमश: ३१३९ आणि ११९८ मतं मिळाली.

फतेपुरामध्ये भाजपने काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा २,७११ मतं अधिक मिळवत विजय मिळवला. याच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला २,७४७ मतं मिळाली.

बोटाद मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा केवळ ९०६ मतांनी पराभव झाला. या जागेवर बीएसपीच्या उमेदवाराला ९६६ मतं मिळाली. तर, तीन अपक्ष उमेदवारांनी जवळपास ७,५०० मतं मिळाली.