Gujarat Crime : पाईपलाईनमध्ये सापडले मृतदेहाचे कुजलेले अवशेष; दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे धक्कादायक खुलासा

Gujarat Crime : गुजरातमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गुजरात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी तो रुग्णालयात पाठवला आहे. मात्र हा मृतदेह कोणाचा आहे याबाबत अद्यापही माहिती मिळालेली नाही

आकाश नेटके | Updated: May 18, 2023, 03:26 PM IST
Gujarat Crime : पाईपलाईनमध्ये सापडले मृतदेहाचे कुजलेले अवशेष; दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे धक्कादायक खुलासा title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Crime News : गुजरातच्या (Gujarat Crime) पाटन जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या या भागात पाण्याची समस्या निर्माण झाल्यानंतर पाण्याच्या पाईप लाईनची (Pipline) तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये खळबळजनक माहिती समोर आली आहे. पाण्याच्या पाइपलाइनमध्ये मानवी मृतदेहाचे तुकडे आढळून आले आहेत. हा प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कुजलेल्या शरीराचे डोके व पायाचा भाग गायब होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Gujarat Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

गुजरातच्या पाटन जिल्ह्यातील सिद्धपूर येथे हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. गुजरातमधील या भागात पाण्याची समस्या होती. काही दिवसांपासून परिसरातील घरांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी येत होते. त्यानंतर अचानक दोन दिवसांपासून पाणी येणे बंद झाले होते. स्थानिकांनी याबाबत पाणी पुरवठा विभागाकडे याबाबत तक्रार केली. पाणी पुरवठा विभागाने अधिकाऱ्यांना पाठवून तपासणी करण्यास सांगितले. यानंतर अधिकाऱ्यांनी पाणी येत का नाही याचा तपास सुरु केला. मात्र पाण्याची मुख्य पाईपलाईन पाहिली असता त्यामध्ये मृतदेहाचे तुकडे आढळून आले.

गेल्या सहा दिवसांपासून सिद्धपूरमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली होती. कित्येक दिवस लोकांना दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत होते. त्यामुळे सिद्धपूरच्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक दिवस असाच प्रकार सुरु होता. मात्र दोन दिवसांपूर्वी अचानक या भागामध्ये पाणीचे येणे बंद झाले. नक्की काय झालं हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा बंद झाल्याने लोक हैराण झाले होते.

याबाबत लोकांनी सिद्धपूर नगरपालिकेच्या कार्यालयात तक्रार केली.  त्यानंतर पाणी पुरवाठा विभागाच्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील पाईपलाईनचे खोदकाम सुरु केले. पाणी का येत नाहीये याचा शोध घेण्यासाठी पाईप कापण्यात आला. मात्र त्यानंतरचे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अज्ञात मृतदेहाचे अर्धवट धड कुजललेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली.

पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

घटनेची माहिती मिळताच पाटनच्या पोलीस अधिक्षक विशाखा डबराल यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. त्यानंतर पाण्याच्या पाईपलाईमधून हा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. "चार-पाच दिवसांपासून स्थानिक लोक घरी दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचे सातत्याने तक्रारी करत होते. नंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तिथे जाऊन पाहणी केली. त्यांनी पाणी का येत नाहीये याची  तपासणी केली असता पाइपलाइनमध्ये अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पाइपलाइन कापली असता त्यामध्ये मानवी शरीराचे तुकडे असल्याचे समोर आले. शरीराच्या धडाचा भाग पाइपलाइनमध्ये अडकला होता आणि डोक्याचा भाग गायब होता. त्यानंतर मृतदेहाच्या धडाचा भाग शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृतदेहाच्या डोक्याचा भाग गायब असल्याने मृतदेहाची ओळख पटवण्यात अडचण येत आहे. त्यामुळे मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला. सध्या हा माणसाच्या शरीराचा भाग असल्याचे वाटत आहे.  मात्र बाकीची माहिती फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच मिळेल," अशी माहिती पोलीस अधिक्षक विशाखा डबराल यांनी दिली.

दरम्यान, स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार दुसऱ्या दिवशी मृतदेहाच्या पायाचा भागही दुसऱ्या भागात सापडला होता. धक्कादायक बाब म्हणजे सात दिवसांपूर्वी तिथल्याच भागातील एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती अशी माहिती स्थानिकांनी दिली.