गुजरातमध्ये 'स्पेशल 26' सत्यात अवतरलं! मागील 2 वर्षांपासून त्याला मिळाली 4.5 कोटींची कामं...

Gujarat Crime :

Updated: Oct 28, 2023, 03:26 PM IST
गुजरातमध्ये 'स्पेशल 26' सत्यात अवतरलं! मागील 2 वर्षांपासून त्याला मिळाली 4.5 कोटींची कामं... title=

Crime News : गुजरातमध्ये (Gujarat Crime) फसवणुकीचं (Fraud) प्रकरण ऐकून पोलिसांच्या (Gujarat Police) पायाखालची जमीनच सरकली आहे. आतापर्यंत बनावट अधिकारी बनून फसवणूक केल्याची प्रकरणं गुजरातमधून समोर आली होती. मात्र आता घोटाळेबाजांनी चक्क बनावट सरकारी कार्यालय (Government Office) सुरु करुन कोट्यावधींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून हे कार्यालय सुरु होतं.

गुजरातमध्ये आतापर्यंत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयात कर्मचारी असल्याचे भासवून बनावट अधिकारी लोकांना फसवत होते. मात्र आता गुजरातमध्ये बनावट सरकारी कार्यालयेही सापडली आहेत. छोटा उदयपूर जिल्ह्यात बनावट सरकारी कार्यालये तयार करून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलं आहे. बनावट सरकारी कार्यालय उभारून सरकारची 4.15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणांत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यातील एकाचे नाव संदीप राजपूत असे आहे. कार्यकारी अभियंता असल्याचे भासवून संदीपने सरकारी पैशांवर डल्ला मारला आहे. त्यासाठी संदीप राजपूतने बनावट कार्यालयही तयार केले होते. संदीपने स्वत:ला जिल्ह्यातील बोदेली येथील पाटबंधारे विभागाशी संलग्न असलेला कार्यकारी अभियंता असल्याचे सांगायचा. पोलिसांनी सांगितले की, संदीप राजपूतने कार्यकारी अभियंता, सिंचन प्रकल्प विभाग, बोदेल्ही या नावाने 21 जुलै 2021 रोजी कार्यालय सुरू केले होते. 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत या कार्यालयातून काम सुरु होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपूतने कार्यकारी अभियंता असल्याचे भासवले आणि सरकारी अधिकारी म्हणून दावा करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली होती. या कालावधीत त्याला 93 सरकारी प्रकल्पाचे काम मिळाले होते. यासाठी त्याला 4,15,54,915 रुपये मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या जावेद मकनोजिया यांच्या लेखी तक्रारीच्या आधारे संदीप राजपूत विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

25 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी सचिन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निधीची मागणी करणाऱ्या अर्जावर चर्चा झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. सीमा ग्राम सिंचन आणि उपसा सिंचन योजनेंतर्गत 12 कामांसाठी 3.78 कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या अर्जांवर अधिकाऱ्यांनी चर्चा केली असता, त्यांच्या लक्षात आले की बोडेली येथे कार्यकारी अभियंता कार्यालय नाही. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू करून बोडेली कार्यालयामार्फत चालवले जाणारे प्रकल्प आणि त्यातून मिळालेल्या निधीची माहिती मागवली. त्यातून जुलै 2021 ते 25 ऑक्टोबरपर्यंत संदीप राजपूतला 4,15,54,915 रुपये सरकारी पैसे मिळाल्याचे उघड झाले. पोलीस तपासानंतर संदीप राजपूत व्यतिरिक्त त्याचा सहकारी अबुबकर सय्यद यालाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.