'देशभक्ती'वर काय म्हणाले जावेद अख्तर?

....तरीही देशाचा तोल कुठेच डगमगला नाही

Updated: Nov 19, 2018, 10:31 AM IST
'देशभक्ती'वर काय म्हणाले जावेद अख्तर?  title=

मुंबई : नेहमीच विविध मुद्द्यांवर आपलं ठाम मत मांडणाऱ्या ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. एका कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादाविषयी आपले विचार मांडत भारत हा एक असा देश आहे जो कोणत्याही परिस्थितीत कधीच डगमगणार नाही, असं स्पष्ट केलं. 

नवी दिल्ली येथे साहित्य क्षेत्राशी निगडीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. आपल्या देशावर प्रेम करणं म्हणजे आई-वडिलांवर प्रेम करण्याइतकं नैसर्गिक आहे, असं ते म्हणाले. 

'देशावर प्रेम करणं हे पूर्णपणे नैसर्गिक आहे', असं म्हणत त्यांनी एक उदाहरण दिलं. 'ज्यावेळी मेरी कोम देशासाठी एखादं पदक जिंकते तेव्हा मलाही प्रचंड अभिमान वाटतो. मी जरी भारतातील त्या भागाला भेट दिलेली नसली तरीही तेथील खेळाडूप्रती मला नक्कीच अभिमान वाटतो. माझ्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर मी प्रेम करतो याचा अर्थ असा नाही की मी इतरांचा द्वेष करतो', असं ते म्हणाले.

राष्ट्रवादाकडे एखादी घातक संकल्पना म्हणून पाहिलं जाऊ नये, असंही त्यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केलं. 

 'जेव्हा एखाद्याचा द्वेष करण्यासाठी राष्ट्रवाद कारणीभूत ठरतो तेव्हा तो अत्यंत धोकादायक असतो. अन्यथा राष्ट्रवाद म्हणजे देशावर असणारं प्रेम. ज्यात काहीच गैर नाही', असंही ते म्हणाले. 

आपल्या देशावर, भारतावर आजवर अनेक आघात झाले आहेत. पण, तरीही देशाचा तोल कुठेच डगमगला नाही, ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.

देशभक्तीविषयी नेमकं काय म्हणाले अख्तर  

राजकीय आणि धार्मिक बाबींवर आपती मतं मांडल्यानंतर होणारा विरोध हा अपेक्षितच असतो, असंही ते यावेळी म्हणाले. तुम्हाला देशद्रोही म्हटलं जातं, यावर काय प्रतिक्रिया द्याल अशा आशयाचा प्रश्न विचारला असता, 'माझ्या देशभक्तीवर मला संपूर्ण विश्वास आहे', असं म्हणत इतर कोणीही त्याविषयी काय म्हणतं याने मला फारसा फरक पडत नाही; हा विचार त्यांनी सर्वांसमोर ठेवला. 

अख्तर यांनी यावेळी इतरही बऱ्याच मुद्द्यावर आपले विचार इतरांना पटवून दिले. यावेळी त्यानी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांना तितक्याच काळजीने हाताळल्याचं पाहायला मिळालं .