Himachal Pradesh Snowfall: हिमाचल प्रदेशात बर्फाचं अक्षरश: वादळ, नळातील पाणीही गोठलं

हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. इतकंच नाही तर पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून वीजेचं संकटही आलं आहे. दरम्यान हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.  

Updated: Feb 1, 2023, 04:16 PM IST
Himachal Pradesh Snowfall: हिमाचल प्रदेशात बर्फाचं अक्षरश: वादळ, नळातील पाणीही गोठलं  title=

Roads Blocked Due to Heavy Snowfall in Himachal: हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी (Snowfall) होत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. बर्फवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशातील 350 हून अधिक रस्ते बंद झाले आहेत. नळातून येणारं पाणी पाईपमध्ये गोठलं असल्याने पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. तसंच ट्रान्सफॉर्मर ठप्प पडल्याने वीजसंकट निर्माण झालं आहे. यामुळे स्थानिकांसह बर्फाचा आनंद लुटण्यासाठी पोहोचलेल्या पर्यटकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली असून अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गाड्या अडकून पडल्या आहेत. 

हिमाचलमधील उंचावरील भागांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने प्रशासनाने तीन राष्ट्रीय महामार्ग बंद केले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात हिमाचलमधील 140 रस्ते खुले करण्यात आले आहेत. बर्फवृष्टीमुळे 450 हून अधिक रस्ते बंद करावे लागले होते. दरम्यान 140 रस्ते खुले करण्यात आल्यानंतरही 357 रस्ते अद्याप बंद आहेत. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचलमधील स्पिती येथे सर्वात जास्त 154 रस्ते बंद आहेत. याशिवाय शिमलामध्ये 86, किन्नोरमध्ये 73, कुल्लू येथे 26, चंबा येथे 13 आणि कांगडा जिल्ह्यातील 2 रस्ते बंद आहेत. 

540 ट्रान्सफॉर्मर ठप्प

स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, हिमाचलमध्ये 540 ट्रान्सफॉर्मर निकामी झाले असून विजेची समस्या निर्माण झाली आहे. त्याचबरोबर 34 पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्याने जनतेसमोर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झालेल्या परिसरांमधून बर्फ हटवण्याचं काम सुरु आहे. यासाठी मशीन्सचा वापर केला जात आहे. किन्नोर येथे 11 सेंमी बर्फ पडला आहे. याशिवाय शिमला येथील खादराला येथेही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. 

अनेक ठिकाणी बर्फवृष्टीसह पाऊस

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंबामध्ये 55.5 मिमी, धर्मशालामध्ये 25.3 मिमी, कांगडामध्ये 20.6 मिमी, मनालीमध्ये 9 मिमी आणि पालमपूरमध्ये 6.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या मते, गुरुवारी म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी मध्यम आणि उच्च उंचीच्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात ४ जानेवारीपर्यंत कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.