निर्भयाची आई संतापली, तुमच्या सारख्या लोकांमुळे पीडितांना न्याय मिळत नाही!

निर्भयाच्या दोषींना माफ करावे, या इंदिरा जयसिंग यांच्या ट्विटवर निर्भयाच्या आईने सणसणीत उत्तर दिले आहे. 

Updated: Jan 18, 2020, 04:03 PM IST
निर्भयाची आई संतापली, तुमच्या सारख्या लोकांमुळे पीडितांना न्याय मिळत नाही! title=

नवी दिल्ली : सोनिया गांधीप्रमाणे निर्भयाच्या दोषींना माफ करावे, या ज्येष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंग यांच्या ट्विटवर निर्भयाच्या आईने सणसणीत उत्तर दिले आहे. तुमच्यासारख्या लोकांमुळेच बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही. अशी लोक समाजासाठी कलंक आहे. पीडित मुलीचा मज्जाक केला जात आहे, असे लोक समाजात आहेत. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. अशा लोकांनी मला कोणाचे उदाहरण देऊन सल्ला देवू नये. जरी परमेश्वर आला तरी मी एका मुलीची आई आहे. मला न्याय मिळाला पाहिजे. मी अशी लोकांना कधीही माफ करणार नाही. मला भगवान व्हायचे नाही, अशा शब्दात निर्भयाची आई आशा देवी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी निर्भयाच्या आईवडिलांना उद्देशून एक ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, ज्या पद्धतीने सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांचे मारेकरी नलिनी हिला माफ केले आणि तिला पाशी देऊ नये, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे निर्भयाच्या आई-वडिलांनी करावे. याबाबत निर्भयाची आई आशा देवी यांना विचारल्यानंतर त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त करत संताप व्यक्त केला. मला असा सल्ला देणाऱ्या त्या आहेत कोण, त्यांना हिंमत तरी कशी होते? आज संपूर्ण देश दोषींना फाशी व्हावी म्हणून मागणी करत आहेत. अशा लोकांमुळे बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही. मी अशा लोकांना कधीच माफ करणार नाही. आज माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. देशातील मुली सुरक्षित राहिल्या पाहिजे, यासाठी त्यांना फाशीच व्हायला पाहिजे. आज या इंदिरा जयसिंग यांचे वय झाले आहे. त्यांना काम मिळत नाही. त्यामुळे त्या अशी सनसनाटी करत पैसा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. समाजसेवेच्या नावाखाली परदेशी पैसा गोळा करतात आणि समाजत असे काहीतरी बरळतात, असे लोक समाजासाठी कलंक आहेत, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

'निर्भया' सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी चार नराधम गुन्हेगारांविरुद्ध नवे डेथ वॉरंट जारी करण्यात आला आहे. या चारही जणांना १ फेब्रुवारी २०२० रोजी तिहार जेलमध्ये फाशी देण्यात येणार आहे. दरम्यान, यातील मुकेश सिंह यांनी दयेचा अर्ज केला होता. तो दिल्लीचे नायब राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी फेटाळून लावला होता. त्यामुळे फाशी कायम आहे.