Online Fraud : तुम्ही ई-घोटाळ्यांच्या सापळ्यात अडकताय; पाहा फसवणुकीच्या धक्कादायक वाटा

Online Fraud : हल्ली प्रत्यक्षात होणारे व्यवहार कमी झाले असून, बसल्या जागेवरून होणारे व्यवहार, खरेदी किंवा तत्सम कामं मार्गी लावण्याकडे सर्वांचा कल असतो. पण, हे ऑनलाईन व्यवहार खरंच सुरक्षित आहेत का?   

प्रसन्न जोशी | Updated: May 31, 2023, 05:00 PM IST
Online Fraud : तुम्ही ई-घोटाळ्यांच्या सापळ्यात अडकताय; पाहा फसवणुकीच्या धक्कादायक वाटा  title=
How does online Fraud happed keeps these things in mind ensure your online data remain safe from cyber crime

Online Fraud : ऑनलाईन फसवणुकीच्या बातम्या आता आपल्यासाठी नव्या नाहीत. कधी ओटीपी शेअर केल्यानं, कधी गुगलवरून घेतलेल्या हेल्पलाईन नंबरवरून तर कधी सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून आर्थिक फसवणूक झाल्याच्या अनेक घटना रोज समोर येतायत. स्वस्त स्मार्ट फोन आणि परडवणारे डेटा किंवा वाय-फाय प्लॅन्स यामुळे एककीकडे आपलं दैनंदिन जीवन सुकर झालं असलं तरी आपल्या ऑनलाईन आर्थिक सुरक्षेसाठीही सतर्क राहायला हवं ही बाब विसरता येणार नाही.

सरकारद्वारे ‘डिजिटल इंडिया’सारखी आखण्यात आलेली धोरणं, रिलायन्सकडून ‘जिओ’द्वारे आणि त्यामुळे अन्य ISP (इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर)कडूनही देण्यात येणारे अत्यंत स्वस्तातले डेटा प्लॅन्स, पैशाच्या देवाण-घेवाणासाठी लोकप्रिय झालेली पेमेंट अँप, देशातल्या 20 ते 45 वयोगटातील पिढी आणि एकूणच मध्यमवर्गाची वाढलेली क्रयशक्ती आणि त्यातून हाती आलेले डिजिटल गॅजेट्स आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नोकरी, आरोग्य, खाद्यसेवा, विविध व्यवसाय, मनोरंजन आदी क्षेत्रांचं डिजिटलायझेशन. 

पैशाच्या जितक्या वाटा तयार होतात, तितक्याच प्रमाणात त्यावर डल्ला मारणारे वाटमारेही बनतात. ऑनलाईन किंवा डिजिटल जगही त्याला अपवाद नाही. जिथं उच्चशिक्षित, तरूण मंडळीही या ई-जाळ्यात अडकतायत तिथं आधीच्या पिढीतील लोक, वयोवृद्ध, ग्रामीण जनता यांचा कसा पाड लागणार?

----------------------GFX

ई- घोटाळ्यांना बळी पडणारे कोण?

- भारतातील 48 टक्के ग्राहक ई-घोटाळ्यांच्या प्रकरणांना प्रतिसाद देतात. त्यातील 31 टक्के लोक यात अडकतात आणि पैसा गमावतात. 

- ई-घोटाळेबाजांच्या आवाहनांना प्रतिसाद देणारे 73 टक्के पुरूष अशा प्रकरणात पैसे गमावतात

- भारतातील 24 ते 37 वयोगटातील तरूणाई ई-घोटाळ्यांना अधिक बळी पडते

- अज्ञातांकडून येणाऱ्या फोन कॉलना प्रतिसाद देणारे लुबाडले जाण्याची सर्वाधिक शक्यता असते

- वय वर्षे ६०च्या पुढील वृद्ध हे ओटीपी स्कॅममध्ये अडकण्याचे प्रमाण मोठे

ई-घोटाळ्यांचे प्रकारही अनेक आहेत. यातील किमान एका प्रकाराशी तरी तुमचा-आमचा एकदा तरी संबंध आलेला आहे. या घोटाळ्यांच्या बातम्या रोजच्या रोज वर्तमानपत्रे, वाहिन्यांवर येऊनही लोक त्याच त्या सापळ्यात अडकत असतात. पाहुयात ई-घोटाळेबाजांचे सर्वाधिक प्रचलित असलेले सापळे-

How does online Fraud happed keeps these things in mind ensure your online data remain safe from cyber crime

How does online Fraud happed keeps these things in mind ensure your online data remain safe from cyber crime

ई-सापळ्यांचा ऑक्टोपस!

- टेक्निकल सपोर्ट- या प्रकारात ई-घोटाळेबाज तुमच्याकडे असलेल्या एखाद्या संगणक, मशिन, विमा पॉलिसी, क्रेडिट कार्ड यासाबंधीची समस्या दूर करण्याच्या बहाण्यानं तुमच्याकडून महत्वाची माहिती घेतात किंवा तुम्हाला तुमच्या मोबाईल-संगणकावर रिमोट अक्सेस सॉफ्टवेअर डाऊनलोड करायला लावतात. असे सॉफ्टवेअर डाऊनलोड केल्यास तुमची सर्व माहिती त्यांच्याकडे जाते.

- गुगलवरून हेल्पलाईन/ग्राहक सेवा न मिळवणे- कोणत्याही तक्रारीसाठी संबंधित संस्था, कंपनीचा नंबर मिळवण्यासाठी पहिली पसंती असते गुगल करण्याला. मात्र, तिथे पहिल्या काही सर्च रिझल्टमध्ये मिळालेले नंबर खरे असतीलच असे नाही. या नंबरद्वारे ई-घोटाळेबाज तुमच्याकडून महत्वाची माहिती, ओटीपी, क्रेडिट कार्ड माहिती घेऊन गैरवापर करू शकतात

- वधू-वर सूचक, डेटिंग अँप- या प्रकारात खासकरून पुनर्विवाह करणारे, ज्येष्ठ नागरिक अधिक अडकतात. तुम्हाला भावनिकदृष्ट्या गुंतवून पैशांची मागणी केली जाते. आमिषं दाखवली जातात. खाजगी फोटो, व्हिडिओ शेअर केला असल्यास तो जाहीर करण्याची धमकी देऊन लुबाडलं जातं

- क्रिप्टो चलनातील गुंतवणूक- कमी अवधीत जास्त परतावा मिळण्याच्या लोभाला भुलून लोक एखाद्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये पैसे गुंतवतात. त्यांच्या ऑनलाईन खात्यात पैसे वाढताना दिसतात. मात्र, अचानक हा प्लॅटफॉर्म आणि तुमचा एजंट गायब होऊ शकतात.

- फिशिंग मेसेज-मेल- तुमच्या क्रेडिट कार्डची मुदत उलटलीये, तुमचं वीज कनेक्शन आज रात्री तोडलं जाईल, तुमची पॉलिसीची मुदत उलटून गेलीय. असे एसएमएस किंवा ई-मेल पाठवले जातात. त्यात कारवाई टाळण्यासाठी एखादी लिंक दिली जाते. लिंकवर क्लिक केल्यास ई-घोटाळेबाज तुमचा मोबाईल-संगणक हॅक करू शकतात. एखाद्या कंपनीचा सेल, फुकट वस्तू किंवा हॉटेल भेट अशी आमिषं असलेल्या लिंकही पसरवल्या जातात

- थर्ड पार्टी फिशिंग वेबसाईट- यात एखाद्या बँक, ई-कॉमर्स, सर्च इंजिन यांची हुबेहूब आवृत्ती असलेली वेबसाईट बनवली जाते. अनेकदा खऱ्या वेबसाईटच्या लिंक्सची वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येत नाही. उदा. Htpps: ही सुरूवात, डावीकडे असलेले कुलपाचे चिन्ह, कंपनी-संस्थेचे अचूक नाव आणि डोमेन (.com, .org, .gov). अशा खोट्या वेबसाईटवर आपली खरी माहिती देऊन फसवणूक होऊ शकते

How does online Fraud happed keeps these things in mind ensure your online data remain safe from cyber crime

How does online Fraud happed keeps these things in mind ensure your online data remain safe from cyber crime

ई घोटाळ्याची ही उदाहरणं एकदा पाहाच... 

नोकरीच्या शोधात असलेल्या रमेश शर्माला एका जॉब सर्च वेबसाईटवरून कॉल आला. नोकरी मिळाल्याचं सांगत त्याच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेतले गेले. रमेशने यात ५ लाख रूपये गमावले. काजल अरोरा या एकल माता आहेत. सोशल मीडियावर त्यांची अमेरिकेतल्या समवयीन भारतीय माणसाशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. अमेरिकेहून आपण महागडं गिफ्ट पाठवत असल्याचं त्यानं काजल यांना सांगितलं. काही दिवसात त्यांना एअरपोर्टवरून कस्टम अधिकाऱ्यांचा फोन आला आणि आयात शुल्कापोटी मोठी रक्कम काजल यांनी भरली. त्यानंतरही काहीबाही नियम सांगून या कथित कस्टम अधिकाऱ्यानं खूप पैसे उकळले.

उज्ज्वलकुमार हे मुंबईत राहणारे एकटे वयस्क इसम. एका डेटिंग अँपवर त्यांचे एका कमी वयाच्या महिलेशी सूर जुळले. तिनं त्यांना व्हिडिओ चॅटिंग करत अश्लील हावभाव करायला सांगितले. त्यांनीही तसं केलं. नंतर तिनं याचा व्हिडिओ उज्ज्वलकुमार यांना पाठवला आणि ब्लॅकमेल करून लाखोंना गंडा घातला. अशी आणखीही उदाहरणं देता येतील. ही आहे ऑनलाईन किंवा सायबर फ्रॉडसची, ई-घोटाळ्यांची काळी दुनिया. भारतात 2015पासून अशा ई-घोटाळ्यांमुळे व्यक्ती, संस्था, कंपन्या यांचं 500 कोटी रूपयांहून अधिक नुकसान झालंय.

हेसुद्धा वाचा : Special Report : स्पर्धा परीक्षा देताय? मग 'हे' वास्तव तुम्हाला माहित असायलाच हवं

 

इथं दिलेल्या या ई-घोटाळ्यांच्या यादीपेक्षाही लुटीचे अनेक मार्ग आहेत. तंत्रज्ञानातील बदल आणि नव्याने येणाऱ्या ई-सुविधा आणि आता तर कृत्रिम प्रज्ञा अर्थात AIच्या आगमनानं ई-घोटाळ्यांचं प्रमाण, आवाका आणि तंत्र बदलच राहणार आहे. अशा वेळी आपण आपली ऑनलाईन सुरक्षा कशी करू शकतो तेही पाहूया. 

  • तुमचे ऑनलाईन पासवर्ड अवघड ठेवा. त्यात कॅपिटल अक्षरे, विशेष चिन्हे, अंक यांचं मिश्रण ठेवा
  • कोणताही बिल भरणा भलत्याच वेबसाईटवरून करण्यापेक्षा त्या त्या संस्था-कंपनीच्या अधिकृत वेबसाईटद्वारेच करा
  • क्रेडिट कार्ड खर्च जाणून घेण्यासाठी एमएमएस सुविधा सुरू करा
  • कधीही ओटीपी कुणालाही सांगू नका. पैसे घेण्यासाठी ओटीपी लागत नाही.
  • मोबाईल आणि संगणकावर चांगले सायबर सुरक्षा सॉफ्टवेअर बसवा
  • कुणीही पाठवलेली फाईल, लिंक उघडण्यापूर्वी काळजी घ्या.
  • इंटरनेवर झालेल्या ओळखीतून प्रेमासाठी किंवा व्यवहारासाठी पुढे जाण्यापूर्वी सावधपणे खात्री करून घ्या
  • आपला मोबईल किंवा संगणक इतरांना हाताळायला देऊ नका
  • सायबर सुरक्षेबद्दल वेळोवेळी माहिती घेत राहा
  • ऑनलाईन फसवणूक झाल्यास राष्ट्रीय मदत क्रमांक 1930 वर संपर्क साधा. तसेच, राज्यातील सायबर सेलला ई-मेल, ट्विट करूनही माहिती देऊ शकता