विकासदर मंदावलाय, पण फार काळजीचे कारण नाही- प्रणव मुखर्जी

विकासदराने साडेचार टक्क्यांची निच्चांकी पातळी गाठली आहे.

Updated: Dec 12, 2019, 09:02 AM IST
विकासदर मंदावलाय, पण फार काळजीचे कारण नाही- प्रणव मुखर्जी title=

नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर GDP मंदावला असला तरी त्याची फार चिंता करण्याचे कारण नाही, असे वक्तव्य माजी राष्ट्रपती आणि अर्थतज्ज्ञ प्रणव मुखर्जी यांनी केले. ते बुधवारी भारतीय सांख्यिकी संस्थेच्या कोलकाता येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुखर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या घसरणीसंदर्भात भाष्य केले. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने यासंदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार विकासदराने साडेचार टक्क्यांची निच्चांकी पातळी गाठली होती. त्यामुळे मोदी सरकारवर टीकेच्या केंद्रस्थानी आले होते. 

मात्र, प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, भारतीय अर्थव्यवस्थेच्या मंदावलेल्या विकासदराविषयी मला फार काळजी वाटत नाही. कारण, काही गोष्टी घडतात आणि त्यांचा परिणाम होणे अपरिहार्य असते, असे मुखर्जी यांनी सांगितले. प्रणव मुखर्जी यांचे हे विधान मोदी सरकारसाठी एकप्रकारचा दिलासा आहे. 

'भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था गंभीर; लहानसहान उपायांनी काहीही होणार नाही'

मात्र, यावेळी प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीविषयी शंका उपस्थित करणाऱ्यांनाही फटकारले. जीडीपीची आकेडवारी जाहीर झाल्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) ही संकल्पना म्हणजे रामायण किंवा बायबल नव्हे. भविष्यात जीडीपी ही बिनकामाची गोष्ट ठरेल, असे त्यांनी म्हटले होते. 

या पार्श्वभूमीवर बोलताना प्रणव मुखर्जी यांनी म्हटले की, मी वर्तमानपत्रामध्ये भारतीय सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे वाचले. मला खूप वाईट वाटले. कारण मी अर्थसंकल्पापूर्वी भारतीय सांख्यिकी विभागाकडून प्रसिद्ध होणाऱ्या आर्थिक अहवालाच्या सत्यतेविषयी खात्री देऊ शकतो. आर्थिक आकडेवारीचे पावित्र्य अबाधित राहिले पाहिजे. कोणत्याही प्रकारे त्यामध्ये फेरफार किंवा त्याची विशिष्ट हेतूने मांडणी करणे योग्य नव्हे. अन्यथा त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही यावेळी प्रणव मुखर्जी यांनी दिला.