निवडणुका जिंकण्यासाठीच लढायच्या असतात; 'या' नेत्याने राहुल गांधींना सुनावले

कोणतीही आघाडी ही तडजोडीच्या पायावरच उभी असते.

Updated: Aug 10, 2018, 09:05 AM IST
निवडणुका जिंकण्यासाठीच लढायच्या असतात; 'या' नेत्याने राहुल गांधींना सुनावले

नवी दिल्ली: तुम्ही जर निवडणूक लढत असाल तर ती जिंकण्याच्या इर्षेनेच लढली गेली पाहिजे, अशा शब्दांत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना लक्ष्य केले. राज्यसभेच्या उपसभापतिपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीनंतर ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले. विरोधक एकत्र न आल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या बी. के. हरिप्रसाद यांचा पराभव झाला होता. 

या पार्श्वभूमीवर ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले की, तुम्ही एखादी निवडणूक लढत असाल तर ती जिंकण्याच्या इर्षेनेच लढली जावी. पराभव झाल्यानंतर आम्हाला आम आदमी पक्ष आणि बिजू जनता दलाची मतं नकोच होती किंवा आम्ही तत्त्वांबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असे घुमजाव करणे योग्य नाही. मुळात कोणतीही आघाडी ही तडजोडीच्या पायावरच उभी असते, असे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले. 

तत्पूर्वी 'आप'नेही मतदानावर 'आप'ने बहिष्कार टाकला होता. मात्र, यासाठी काँग्रेस पक्षाची आडमुठी भूमिका कारणीभूत असल्याचा आरोप 'आप'ने केला. किंबहुना काँग्रेस हाच विरोधकांच्या ऐक्यातील सर्वात मोठा अडथळा असल्याचे 'आप'ने म्हटले होते.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close