'नव्या जमान्यतील रावण, धर्म आणि रामविरोधी' पोस्टर जारी करत भाजपची राहुल गांधींवर बोचरी टीका

BJP on Rahul Gandhi : भाजपनं राहुल गांधींवर निशाणा साधत त्यांची तुलना रावणाशी केलीय. राहुल गांधींना रावण दाखवत भाजपनं पोस्टर जारी केलंय. यात भाजपनं राहुल गांधींचा रावण असा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 5, 2023, 07:49 PM IST
'नव्या जमान्यतील रावण, धर्म आणि रामविरोधी' पोस्टर जारी करत भाजपची राहुल गांधींवर बोचरी टीका title=

BJP on Rahul Gandhi : भाजपनं आपल्या एक्स हँडलवरुन पोस्टर (Poster) जारी करत राहुल गांधींचा उल्लेख रावण असा केलाय. राहुल गांधींवरचा (Rahul Gandhi) भाजपचा (BJP) हा सर्वात तिखट हल्ला मानला जातोय. विशेष म्हणजे अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरेस ( George Soros) यांच्या नावाचा उल्लेख पोस्टरमध्ये करत राहुल गांधींशी त्यांचं नाव जोडण्यात आलंय. आता अमेरिकन उद्योगपतीचा या प्रकरणाशी काय संबंध आहे हे पुढे सांगणार आहोत मात्र त्याआधी भाजपच्या पोस्टमध्ये काय म्हटलंय.. ते पाहुयात.. भाजपनं राहुल यांच्या रुपातील 7 चेहऱ्यांच्या रावणाचा फोटो शेअर केलाय. नवीन जमान्यातील रावण आहे, ज्याचा उद्देश देशाला बरबाद करणं हाच आहे.. हा रावण दुष्ट आहे.. धर्म आणि रामविरोधी आहे असा हल्लाबोल या पोस्टरमधून करण्यात आलाय.. पोस्टरखाली काँग्रेस पार्टी प्रोडक्शन, जॉर्ज सोरेस दिग्दर्शित असा उल्लेख करण्यात आलाय. आता भाजपनं अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरेसशी का जोडलंय पाहुयात.. 

राहुल-सोरोस प्रकरण काय आहे?
जॉर्ज सोरोस अमेरिकेतील उद्योगपती आहेत. CAA, कलम 370 वरुन सोरोस यांनी टीका केली होती. यावर सोरोस यांना भाजपसह परराष्ट्र मंत्रालयानंही प्रत्युत्तर दिलं. अमेरिकन उद्योगपतीने भारतातील लोकशाही कारभारात हस्तक्षेप करु नये असा टोला लगावण्यात आला. विशेष म्हणजे राहुल गांधी सोरोस यांना भेटल्याचा आरोप भाजपने केला आहे.  भारत जोडो यात्रेत सोरोस यांच्या 'ओपन सोसायटी फाऊंडेशन'चे कार्यकर्ते सामील झाल्याचा आरोप भाजपनं केलाय. 

अमेरिकन उद्योगपती सोरोस यांनी भारताच्या अंतर्गत घडामोडींवरुन टीका केली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं त्यांना चोख उत्तर दिलं. मात्र राहुल गांधींना रावण दाखवताना सोरोस आणि काँग्रेसचं साटंलोट असल्याचाच आरोप भाजपनं केलाय. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.. 

भाजपने जारी केलेल्या पोस्टरमध्ये राहुल गांधी यांना सात डोकी दाखवण्यात आली आहेत. पोस्टरवर भारत खतरे में है असं लिहिण्यात आलं आहे तर खाली इंग्रजी अक्षरात 'A CONGRESS PARTY PRODUCTION डायरेक्टेट बाय जॉर्ज सोरोस' असं लिहिण्यात आलं आहे. अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्या 'ओपन सोसायटी फाऊंडेशन'चे उपाध्यक्ष सलिल शेट्टी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. 17 फेब्रुवारीला भाजपा प्रवक्ता गौरव भाटिया यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. यात राहुल गांधी आणि सलिल शेट्टी एकत्र दिसत होते. 

ओपन सोसायटी फाऊंडेशन
जॉर्ज सोरोस यांनी 1993 मध्ये ओपन सोसायटी फाऊंडेशनची सुरुवात केली. ही संस्था, शिक्षण, आरोग्य आणि मानवाधिकार क्षेत्रात काम करते. जगभरातील जवळपास 100 देशांमध्ये या संस्थेचं काम चालतं. या संस्थेने आतापर्यंत 32 अरब डॉलर दान केल्याचा दावा या संस्थेच्या वेबसाईटवर करण्यात आला आहे.