Indian Railways Mission Raftaar News In Marathi : वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडू लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक सुधारण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील विविध मार्गांवर नव्याने रेल्वे चालवली जाते. रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि वेळेत होण्यासाठी तसेच रेल्वे गाड्यांची गती वाढवण्यावर रेल्वे प्रशासन भर देत आहे. भारतीय रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करुन गाड्यांचा वेग वाढवण्यात येत आहे. त्यामुळे आता तुम्हाला लांब पल्ल्याचे अंतर गाठण्यासाठी आता कमी वेळ लागणार आहे. भारतीय रेल्वेकडून यासंदर्भात महत्वाची अपडेट आली आहे.
भारतीय रेल्वेच्या 'मिशन राफ्तार' अंतर्गत, मुंबई-दिल्ली रेल्वे मार्ग ताशी 160 किमी वेगाने धावण्यासाठी सज्ज होत आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाकडून मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गाच्या अद्ययावतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून आगामी निवडणुकीच्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच मार्च 2024 मध्ये राजधानी एक्सप्रेस 160 किमी वेगाने चालवण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता मुंबईहून दिल्लीला अवघ्या 12 तासात जाणं शक्य होणार आहे. सध्या या प्रवासाला 16 तास लागतात. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या गाड्यांचा वेग ताशी 160 किमी नेण्यासाठी सुरू असलेला काम अंतिम टप्प्यात आहे.
तसेच मेल-एक्स्प्रेस, सुपरफास्ट आणि मालवाहू रेल्वे गाड्यांचा वेग दुप्पट करण्यासाठी आणि सरासरी वेग ताशी 25 किमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने 'मिशन रफ्तार' सुरू केले आहे. त्यासाठी 1379.14 किलोमीटरचा मुंबई-दिल्ली मार्ग निवडण्यात आला आहे.
दरम्यान या मार्गावरचा वेग वाढवण्याची मुदत मार्चपर्यंत आहे. यासाठी 6,661.41 कोटी रुपये खर्च करून पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणा अद्ययावत केली जात आहे. मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील मानवरहित क्रॉसिंग बंद करण्यात आले आहेत. रेल्वे ट्रॅकवर प्राणी येऊ नये यासाठी 380 किमी पेक्षा जास्त ट्रॅकवर मेटल व्हायब्रेटरी वर्क करण्यात आले आहे. 80 टक्क्यांहून अधिक स्विच वक्र नव्याने सादर केले आहेत.
वंदे भारत मुंबई-अहमदाबाद दरम्यान 5.15 तासांचे अंतर पूर्ण करते. तर शताब्दीला मुंबई-अहमदाबादसाठी 6.35 मिनिटे लागतात. सध्या रेल्वे ट्रेन ताशी 130 किमी वेगाने धावते. ताशी 160 किमी वेगाने रेल्वेने प्रवास केल्यास 25-30 मिनिटांची बचत होईल. मुंबई आणि गोध्रा-रतलाम विभागात तीव्र वळणांमुळे या विभागात वेग वाढणार नाही.