अवघ्या ४९ पैशांमध्ये लाखोंचा विमा; भारतीय रेल्वेची नवी योजना

अशा प्रकारे मिळेल हा विमा... 

Updated: Feb 11, 2020, 09:35 AM IST
अवघ्या ४९ पैशांमध्ये लाखोंचा विमा; भारतीय रेल्वेची नवी योजना  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि निश्चिंत व्हावा यासाठी भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून बऱ्याचदा काही नव्या योजना राबवण्यात येतात. प्रवाशांना या योजनांचा फायदाही अनेकदा होतो. यातच आता आणखी एका योजनेची भर पडत आहे. ही योजना आहे विमा अर्थात insuranceची. अवघ्या ४९ पैशांमध्ये आता रेव्ले प्रवासाचं तिकीट काढतानाच विमा उतरवता येणार आहे. 

ऑनलाईन तिकीट बुक करतेवेळी  इंडियन रेलवे कॅटरिंग एण्ड टूरिजम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर तुम्हाला एक पर्याय विचारण्यात येईल. ज्यामध्ये विमा उतरवण्यास तुम्ही तयार आहात का, असा प्रश्नही केला जाईल. या योजनेअंतर्गत प्रवासी त्यांच्या प्रवासादरम्यान अवघ्या ४९ पैशांमध्ये त्यांचा प्रवास विमा उतरवू शकणार आहेत. 

१० लाखांचा विमा 

 IRCTCच्या संकेतस्थळावर तिकीट काढतेवेळी या प्रक्रियेतील अखेरच्या टप्प्यावर तुम्ही विमा घेऊ इच्छिता का, असा पर्याय तुम्हाला विचारण्यात येतो. हा पर्याय निवडल्यास तुमच्याकडून ४९ पैसे इतका दर आकारला जाईल. ४९ पैसे दिल्यानंतर तुम्हाला १० लाखांचा प्रवास विमा दिला जातो. 

रेल्वे प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची दुर्दैवी घटना घडल्यास प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांना या विम्याचा फायदा होणार आहे. प्रवास विमा घेण्याचा निर्णय प्रवासी स्वत: करु शकतात. त्यांना हा विमा नको असल्यास ते हा पर्यायही निवडू शकतात. 

अशा प्रकारे मिळेल हा विमा... 

 IRCTCच्या संकेतस्थळावर किंवा ऍपच्या माध्यमातून तिकीट काढतेवेळी विम्याचा पर्याय तुमच्यासमोर येतो. तिकीट बुक झाल्यानंतर प्रवाशांचाय एसएमएस किंवा ई-मेल अथवा या दोन्ही माध्यमांतून त्यांच्या नॉमिनीविषयी माहिती देण्यासाठीची एक लिंक पाठवली जाते. या लिंकवर क्लिक केलं असता तुम्ही थेट इंश्युरन्स कंपनीच्या संकेतस्थळावर पोहोचता. जिथे तुम्ही नॉमिनीविषयीची संपूर्ण माहिती भरु शकता.  IRCTCकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार १० लाख रुपयांच्या या विम्याचा फायदा फक्त कन्फर्म आणि RAC तिकीट धारकांनाच होणार आहे. वेटिंग लिस्ट किंवा ई- तिकिटधारकांना याचा फायदा नाही. पाच वर्षांहून कमी वय असणाऱ्या बालकांनाची या विम्याअंतर्गत स्थान देण्यात आलेलं नाही. 

कोणत्या परिस्थितीत विम्याची रक्कम संबंधीतांना मिळू शकते? 

प्रवास विम्याअंतर्गत मिळणारी रक्कम ही दुर्घटनेत तुमचं झालेलं नुकसान किती आहे, यावरुन निर्धारित करण्यात येते. नुकसानाची विभागणी ही पाच वर्गांमध्ये केली आहे. रेल्वे दुर्घटनेत प्रवाशाला कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांचा क्लेम मिळू शकतो. शिवाय प्रवासादरण्यान मृत्यू झाल्यास मृतदेह नेण्यासाठी वाढीव १० हजार रुपयांचीही मदत करण्यात येते. रेल्वे प्रवासातील दुर्घटनेमध्ये काही अंशी अपंगत्व आल्यास या परिस्थितीत ७.५ लाख रुपये आणि जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाल्यास २ लाख रुपयांचा क्लेम मिळतो.