दिवसा शिक्षक रात्री हमाल... 'हा' व्यक्ती इतकी जीव तोड मेहनत का करतोय?

दिवसा शिक्षक आणि रात्री हमाल 'या' व्यक्तीची कहानी ऐकून तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील

Updated: Dec 13, 2022, 06:12 PM IST
दिवसा शिक्षक रात्री हमाल... 'हा' व्यक्ती इतकी जीव तोड मेहनत का करतोय? title=
Inspirational Stories odisha person lecturer in the day coolie at night person working so hard education news nz

Inspirational Stories : जगात अनेक प्रकारची लोकं आहेत. काही लोक तुम्हाला नवीन काहीतरी शिकवून जातात तर काही तुम्हाला प्रेरित करुन जातात. अशा लोकांचा वावर आपल्या आसपास कमी पाहायला मिळतो. अशीच एक ओडिशातील व्यक्ती आहे जी आपल्या प्रयत्नांनी लाखो लोकांना प्ररित करण्याचे काम करते. आज आपण या व्यक्तीच्या कष्टाची काहाणी सांगणार आहोत. 

 

कारण खूप पैसे कमवणे हे नसून...

एका खासगी महाविद्यालयातील प्राध्यापक योगेश पात्रा हे रात्री लाल गणवेशात रेल्वे स्थानकावर लोकांचे सामान घेऊन जातात. त्यामागचे कारण खूप पैसे कमवणे हे नसून शेकडो मुलांना मोफत शिक्षण देण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यामुळे ते नियमितपणे रेल्वे स्टेशनवर कुली बनून प्रवाशांचे सामान उचलतात. प्रा.पात्रा यांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि कष्टाने गरीब मुलांचे भविष्य सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

ही गोष्ट ओडिशातील गंजम जिल्ह्यातील योगेश पात्राची आहे. पात्रा यांनी त्यांची मातृभाषा ओडियामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ते जिल्ह्यातील एका खासगी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच पात्रा त्यांच्या स्थानिक भागात गरीब मुलांसाठी मोफत प्रशिक्षण चालवतात. जिथे त्यांनी अनेक शिक्षकांची नियुक्ती केली आहे. पात्रा (31) हे दिवसा एका खासगी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतात आणि मुलांना शिकवतात, तर रात्री रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे सामान उचलण्याचे काम करतात. यानंतर पात्रा आपल्या कमाईचे पैसे कोचिंगमधील शिक्षकांना मासिक पगार म्हणून देतात.

 

2011 पासून कुली काम करत आहे

त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी एक नोंदणीकृत कुली आहे आणि 2011 पासून प्रवाशांचे सामान उचलत आहे. लॉकडाऊन दरम्यान गाड्यांचे येणे आणि सुटणे बंद झाल्यानंतर आमची कमाई थांबली. आर्थिक चणचण असतानाही घरी बसून गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्याचा विचार केला आणि सुरुवात केली. अनेक वर्षांपासून मी दहावीच्या मुलांना मोफत शिक्षण दिले आहे. आता मी एक कोचिंग चालवतो जिथे 8वी ते 12वी पर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. यासोबतच मी नियमितपणे कोचिंग चालवण्यासाठी चार शिक्षकांची नियुक्ती केली आहे, जे मुलांना वेगवेगळे विषय शिकवतात.

 

अतिथी प्राध्यापक

पात्रा यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, सध्या माझी जिल्ह्यातील एका खासगी महाविद्यालयात अतिथी प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली आहे. कॉलेजकडून पुरेसे पैसे मिळत नसल्यामुळे मी दिवसा कॉलेजला वेळ देतो आणि रात्री कुली म्हणून रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे सामान उचलतो. यामुळे मला माझे कुटुंब आणि कोचिंग चालवणे सोपे जाते.

पात्रा यांनी सांगितले की, मी कुली म्हणून एका महिन्यात सुमारे 10 हजार ते 12 हजार कमावतो. जिथे मी माझ्या कमाईतील बहुतांश पैसा शिक्षकांना पगार म्हणून देतो. मी माझ्या कोचिंगसाठी प्रत्येक शिक्षकाला 2000-3000 रुपये मासिक वेतन देतो. पात्रा म्हणाले की, महाविद्यालयात पाहुणे प्राध्यापक म्हणून मला प्रत्येक वर्गासाठी 200 रुपये मिळतात. मी कॉलेजमध्ये आठवड्यातून जास्तीत जास्त सात वर्ग घेऊ शकतो.

पात्रा म्हणाले की, मी माझ्या पालकांसोबत राहतो आणि मला गरीब मुलांना मोफत शिक्षण द्यायला आवडते आणि पुढेही करत राहीन. मी माझ्या अथक परिश्रमाने गरीब मुलांचे भविष्य सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.