नववर्षात IRCTC कडून प्रवाशांना सुखद धक्का, नवी सुविधा सुरू

आतापर्यंत रेल्वे प्रवास म्हटलं की आयआरसीटीसी हे समीकरणच देशात तयार झाले आहे.

Updated: Jan 10, 2019, 11:20 AM IST
नववर्षात IRCTC कडून प्रवाशांना सुखद धक्का, नवी सुविधा सुरू title=

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेची सहयोगी कंपनी आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग ऍंड टुरिझम कॉर्पोरेशनने हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुखद धक्का दिला आहे. आतापर्यंत रेल्वे प्रवास म्हटलं की आयआरसीटीसी हे समीकरणच देशात तयार झाले आहे. रेल्वेचे तिकीट बुक करणे असू दे की प्रवासात काही खायला मागवणे असू दे, आयआरसीटीसी सगळीकडे दिसते. पण आता आयआरसीटीसी हवाई प्रवास करणाऱ्या ग्राहकांनाही नवी सुविधा देणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून जर हवाई प्रवासाची तिकिटे बुक केली तर प्रवाशांना ५० लाख रुपयांचा विमा मोफत दिला जाईल. जाण्याच्या आणि येण्याच्या प्रवासासाठी हा विमा असेल. त्यासाठी प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही. आयआससीटीसी स्वतःच या विम्याचा हफ्ता भरणार आहे. त्यासाठी एका खासगी विमा कंपनीशी करारही करण्यात आला आहे. 

आयआरसीटीसीचे महासंचालक एम. पी. मल्ल म्हणाले की, प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता त्यांना ५० लाख रुपयांचा विमा दिला जाईल. आयआरसीटीसीकडूनच या विम्याचा हफ्ता भरला जाईल. प्रवाशांकडून विमान तिकीट बुक करताना जे कमिशन घेतले जाते. त्यामधून आयआरसीटीसी या विम्याचा हफ्ता भरेल. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून दररोज लाखो प्रवासी रेल्वे प्रवासाची तिकिटे बुक करत असतात. त्याचबरोबर याच वेबसाईटवरून दररोज सहा हजार विमानाची तिकिटेही बुक केली जातात. 

हवाई प्रवास करणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी ही सुविधा दिली जाईल. प्रवासी एक्झिक्युटिव्ह किंवा इकॉनॉमी कोणत्याही श्रेणीतून प्रवास करीत असला, तरी त्याला या सुविधेचा वापर करता येईल. त्याचबरोबर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीही विम्याचे कवच देण्यात येईल. यासाठी आयआरसीटीसीने भारती ऍक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीशी करार केला आहे. याच कंपनीकडून हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमा कवच दिले जाईल.