राऊतांच्या विधानावरुन इस्रायल संतापला! भारताला पाठवलं खरमरीत पत्र; हिटरलचा उल्लेख करत..

Israel Embassy letter to India Over Sanjay Raut: इस्रायलने कठोर शब्दांमध्ये आपली भूमिका मांडताना संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबद्दल संताप व्यक्त केला आहे. यावर राऊत यांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 25, 2023, 11:39 AM IST
राऊतांच्या विधानावरुन इस्रायल संतापला! भारताला पाठवलं खरमरीत पत्र; हिटरलचा उल्लेख करत.. title=
राऊत यांच्या पोस्टवर नोंदवला आक्षेप

Israel Embassy letter to India Over Sanjay Raut: शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हिटलरसंदर्भात केलेल्या विधानाची दखल थेट इस्रायलने घेतली आहे. इस्रायलने या विधानासंदर्भात आक्षेप घेतला असून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे. इस्रायली दूतावासाने यहुदींसंदर्भात करण्यात आलेल्या चुकीच्या विधानावरुन परराष्ट्र मंत्रालयाबरोबरच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कठोर शब्दांमध्ये एक पत्र लिहिलं आहे. पत्रामध्ये इस्रायली दुतावासाने शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची तक्रार केली आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवरुन (ट्वीटरवरुन) यहुदींविरोधात पोस्ट केली होती. राजकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांनी केलेल्या या पोस्टमुळे सतत भारताच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या देशाला कशापद्धतीने वाईट वाटलं आहे याची जाणीव शिवसेनेच्या या नेत्याला करुन देण्यात यावी अशी इस्रायलच्या दुतावासाची मागणी आहे.

राऊत यांनी काय म्हटलं होतं?

14 नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांनी गाझामधील रुग्णालयामधील 'गंभीर परिस्थिती'बद्दल भाष्य करताना एक पोस्ट केली होती. हिंदीमध्ये पोस्ट करत संजय राऊत यांनी, "हिटलर ज्यू समाजाचा एवढा द्वेष का करत होता? हे आता तुम्हाला समजतं का?" अशी पोस्ट केली होती. नंतर राऊत यांनी ही पोस्ट हटवली होती. मात्र तोपर्यंत इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी या पोस्टचा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता. राऊत यांनी हे ट्वीट डिलीट करण्याआधी ते 2,93,000 हून अधिक वेळा पाहिलं गेलं होतं. सूत्रांनी 'द प्रिंट'ला दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने भारत सरकारला पाठवलेल्या ई-मेलमध्येही हा स्क्रीनशॉट अटॅच केला आहे.

इस्रायलने व्यक्त केलं आश्चर्य

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारला पाठवलेल्या या पत्रामध्ये इस्रायलने आश्चर्य व्यक्त केलं आहे. एक भारतीय खासदार अशाप्रकारे 'यहूदी विरोधात' सहभागी झाला आहे जो यापूर्वी कधीही पाहिला गेला नाही. हे हैराण करण्यासारखं आहे, असं इस्रायलने म्हटलं आहे.

संजय राऊतांनी मांडली भूमिका

"ते ट्वीट करुन बराच वेळ झाला. मी ते ट्वीट हटवलंही आहे. त्यामध्ये हिटलरचा संदर्भ होता. मात्र त्यातून इस्रायलला दुखावण्याचा माझा प्रयत्न नव्हता. ज्या पद्धतीने हमासने इस्रायलवर हल्ला केला त्यावर मी टीका केली आहे. त्याच पद्धतीने गाझामधील रुग्णालयांवर हल्ला करण्यात आला. त्यावेळी अनेक बाळं आणि लहान मुलांचा मृत्यू झाला होता. मुलांना युद्धातून दूर ठेवलं पाहिजे. हे माणुसकीला धरुन नाही. तुम्ही माणुसकी दाखवत नसल्याने मी तसं म्हटलं होतं. या प्रकरणाच्या एका महिन्यानंतर इस्रायलच्या दूतावासाने पत्र लिहिलं आहे. नक्कीच त्यांना कोणी तरी संजय राऊतला विरोध करण्यासाठी हे पत्र लिहा," असं राऊत यांनी एएनआयशी संवाद साधताना म्हटलं.

यापूर्वीही केली अशी विधानं

ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या इस्रायल विरुद्ध हमास युद्धाबद्दल संजय राऊत अनेकदा बोलले आहेत. मागील महिन्यामध्ये संजय राऊत यांनी भाजपाची तुलना दहशतवादी गटाशी केली होती. इस्रायलने भारत सरकारला हेरगिरी करणाऱ्या पेगासस सॉफ्टवेअर पुरवलं असल्याने भारत इस्रायलचं समर्थन करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला होता.