काश्मीरची कोंडी फुटणार; ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींशी वाटाघाटींना सुरुवात?

जेणेकरून काश्मीरमध्ये चर्चेसाठी अवकाश निर्माण होईल.

Updated: Aug 24, 2019, 11:32 AM IST
काश्मीरची कोंडी फुटणार; ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींशी वाटाघाटींना सुरुवात? title=

नवी दिल्ली: अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर तणावपूर्ण वातावरणामुळे काश्मीरमध्ये निर्माण झालेली कोंडी आता फुटण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि 'पीडीपी'च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्याशी चर्चा सुरु केल्याचे समजते. 

जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्यापासून काश्मीरमधील प्रमुख नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते. यापैकी ओमर अब्दुल्ला सध्या हरी निवास पॅलेस तर मेहबुबा मुफ्ती श्रीनगरच्या चश्मे शाही येथे स्थानबद्ध आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तपासयंत्रणांचे काही अधिकारी या दोन्ही नेत्यांशी चर्चा करत आहेत. काश्मीर खोऱ्यातील राजकीय कोंडी कायम राहू देणे शक्य नाही. त्यामुळे सरकार ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती या दोघांवरील निर्बंध उठवण्याचा विचार करत आहे. जेणेकरून काश्मीरमध्ये चर्चेसाठी अवकाश निर्माण होईल, अशी माहिती या सूत्रांनी दिली. 

गेल्यावर्षी काश्मीर खोऱ्यात पंचायत स्तरावरील निवडणुका शांततेत पार पडल्या होत्या. हे सरकारच्यादृष्टीने मोठे यश होते. मात्र, पंच आणि सरपंचाच्या माध्यमातून नवा राजकीय अवकाश तयार व्हायला आणखी काही अवधी जावा लागेल. त्यामुळे सध्याची कोंडी फोडण्यासाठी काश्मीरमध्ये सकारात्मक संदेश पसरवणाऱ्या नेत्यांची गरज आहे. 

सध्या सरकारला आगामी काळात काश्मीरमधील राजकारणाचा चेहरा कसा असेल आणि निर्बंध उठवल्यानंतर ओमर अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती यांच्यासारखे नेते काय भूमिका घेतील, याची चिंता आहे. त्यामुळे सरकारकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून सरकारने खोऱ्यातील निर्बंध पूर्णपणे उठवण्यापूर्वी ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्याशी चर्चा सुरु केल्याचे समजते.