कर्नाटक निवडणूक 2018 : येडियुरप्पांचा 'झोल' आला समोर

तुम्हीही बुचकाळ्यात पडलात ना... कारणच तसं आहे... त्याचं झालं असं की...

Updated: May 11, 2018, 08:12 PM IST
कर्नाटक निवडणूक 2018 : येडियुरप्पांचा 'झोल' आला समोर title=

बंगळुरू : कर्नाटक निवडणुकीत दररोजच नागरिकांसाठी आश्चर्यकारक काहीतरी घडतंय. भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असलेल्या येडियुरप्पांचा एक 'झोल' समोर आल्यानं तर आणखीन खळबळ उडालीय. येडियुरप्पा यांनी आपल्या शिक्षणाच्या रकान्यात 'बारावी' म्हटल्यानं आता नागरिकच बुचकाळ्यात पडलेत... येडियुरप्पांचं शिक्षण नक्की कुठपर्यंत पूर्ण झालंय? असा साहजिकच प्रश्न त्यांना पडलाय. 

2013 चं प्रतिज्ञापत्रं... 

तुम्हीही बुचकाळ्यात पडलात ना... कारणच तसं आहे... त्याचं झालं असं की 2013 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रात येडियुरप्पा यांनी शिक्षणाच्या रकान्यात बीए अर्थात बॅचलर ऑफ आर्टस् असं लिहिलं होतं. आपण बंगळुरू युनिव्हर्सिटीतून बीए पूर्ण केल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केला होता. यावेळी येडियुरप्पा कर्नाटक जनता पक्षाच्या तिकीटावर शिकारीपुरा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढले होते. 

...आणि शिक्षण कमी झालं!

परंतु, 2014 साली शिमोगा लोकसभा मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर लढलेल्या युडियुरप्पांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आपलं शिक्षणात प्री युनिव्हर्सिटी कोर्स पूर्ण केल्याचं म्हटलं... प्री युनिव्हर्सिटी कोर्स बारावीच्या समकक्ष समजलं जातं. 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही येडियुरप्पांनी आपलं शिक्षण बारावी असल्याचं म्हटलंय. यंदा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत येडियुरप्पा भाजपकडून शिकारीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 

संपत्तीही कमी झाली

संपत्तीच्या बाबतीत म्हटलं तर...

- 2008 मध्ये येडियुरप्पा यांच्याकडे एकूण 1.82 करोडोंची संपत्ती होती

- 2013 मध्ये संपत्तीत वाढ होऊन ती एकूण 5.83 करोडवर पोहचली

- 2014 मध्ये युडियुरप्पांच्या संपत्तीत आणखीन वाढ झाली आणि त्यांची एकूण संपत्ती 6.97 करोडोंवर गेली

- परंतु, यंदा (2018 साली) मात्र येडियुरप्पा यांची संपत्ती कमी होऊन 4.85 करोडवर दाखल झालीय