श्रीदेवी नावाने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, मग नरबळी द्यायला भाग पाडलं... धक्कादायक खुलासा

केरळ हत्याकांडात धक्कादायक खुलासा, आधी दोन महिलांची पूजा केली आणि नंतर...

Updated: Oct 12, 2022, 10:07 PM IST
श्रीदेवी नावाने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, मग नरबळी द्यायला भाग पाडलं... धक्कादायक खुलासा title=

Kerala Crime News : केरळमध्ये दोन महिलांची हत्या करुन नरबळी दिल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. घरात संपत्ती यावी यासाठी एका दाम्पत्याने दोन महिलांचा बळी दिला. याप्रकरणी पोलिसांनी त्या दाम्पत्याह 3 जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी त्या दोन महिलांचा आधी गळा चिरला त्यानंतर त्यांना जमिनीत पुरलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. याप्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शफी याच्यासह मसाज थेरपिस्ट असलेले भगवल सिंग आणि त्यांची पत्नी लैला यांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद शफी हा एक मनोरुग्ण आहे. इतरांना दुखापत करण्यात त्याला आनंद मिळतो, तसंच त्याला लैंगिकतेचंही व्यसन आहे अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

नरबळी प्रकरणात धक्कादायक खुलासे
आरोपींना अटक केल्यानंतर सुरुवातीला त्यांनी आपण हत्या केलं नसल्याचं सांगितलं, पण जेव्हा पोलिसी हिसका दाखवला तेव्हा त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. दोन महिलांची हत्या केल्यानंतर त्यांचं मांस खाल्याची धक्कादायक कबूली आरोपींनी दिली. पण याबाबत अद्याप कोणताही पुरावा नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

शफीने असं रचलं कारस्थान
नरबळी दिल्यास घरात आर्थिक समृद्धी येईल असं शफीने या दाम्पत्याला सांगितलं. याआधी एर्नाकुलम इथल्या पठाणमथिट्या इथं एका 75 वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी मोहम्मद शफीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शफीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. नरबळी प्रकरणातील मास्टरमाईंडही तोच आहे. फेसबूकवर फेक प्रोफाईल बनवून शफीने भगवल सिंह आणि लैला यांच्याशी ओळख वाढवली. 

फेसबूकवर फेक अकाऊंट
शफीने फेसबूकवर श्रीदेवी नावाने एक फेक अकाऊंट तयार केलं होतं. यावरुनच त्याने भगवल सिंहला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. फेसबूक चॅटिंगमध्ये भगवल सिंहने आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल त्याला सांगितलं. यावर श्रीदेवी नावाने चॅटिंग करणाऱ्या शफीने भगवल सिंहला उपाय सांगितला. भगवल सिंहला त्याने रशीद नावाच्या एका व्यक्तीला भेटण्याचा सल्ला दिला. रशीद जसं सांगेल तसं केल्यास त्याच्या घरात आर्थिक सुबत्ता येईल असं श्रीदेवी उर्फ शफीने त्याला सांगितलं. यावर भगलसिंहनेही विश्वास ठेवला.

रशीद म्हणजेच मोहम्मद शफी
श्रीदेवी उर्फ शफीने ज्या रशीदला भेटण्याचा सल्ला भगवल सिंहला दिला होता. वास्तविक तो स्वत: मोहम्मद शफीच होता. भगवल सिंह आणि त्याची पत्नी लैलाने रशीद समजून मोहम्मद शफीची भेट घेतली. शफीने त्यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नरबळी देण्याचा सल्ला दिला. 

दोन महिलांना दाखवलं आमिष
आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या रोझलिन आणि पद्मा नावाच्या दोन महिलांना मोहम्मद शफीने पैशांचं आमिश दाखवून त्यांना भगवल सिंहच्या घरी घेऊन आला. जून महिन्यात रोझलिन बेपत्ता झाली तर सप्टेंबर महिन्यात पद्मा बेपत्ता झाली होती. दोघींची गळा चिरून हत्या केल्या नंतर त्यांना जमिनीत पुरण्यात आलं. त्याआधी दोघींची पूजा करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या शरीराचे अनेक तुकडे करुन ते घराच्या मागे पुरण्यात आले.