केरळमध्ये एक किलो मिरचीसाठी मोजावे लागतायंत ४०० रुपये

कांदा, बटाटा आणि कोबीसारख्या फळभाज्यांसाठीही प्रतिकिलो ९० रुपये मोजावे लागत आहेत. 

Updated: Aug 20, 2018, 01:30 PM IST
केरळमध्ये एक किलो मिरचीसाठी मोजावे लागतायंत ४०० रुपये title=

कोची: पावसाचा जोर ओसरल्याने आता केरळमधील जीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडल्यामुळे नागरिकांना आता अन्नधान्य व जीवनावश्यक गोष्टींच्या भीषण तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. यापैकी कोची शहरात भाजीपाल्याचा मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये काही व्यापाऱ्यांच्या काळाबाजारामुळे भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत.  त्यामुळे साधी एक किलो मिरची विकत घ्यायला येथील नागरिकांना तब्बल ४०० रुपये मोजावे लागत आहेत. 

संतप्त रहिवाशांनी याविरोधात आवाज उठवला आहे. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत या भाजी विक्रेत्यांना समज दिली. मात्र, अजूनही एक किलो मिरचीचे दर १२० रुपयांच्या घरात आहेत. तर दुसरीकडे कांदा, बटाटा आणि कोबीसारख्या फळभाज्यांसाठीही प्रतिकिलो ९० रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय, तांदूळ आणि साखरेचे दरही साधारण १५ रुपयांनी वाढले आहेत. 

याविरोधात कलूर येथे नागरिकांनी दुकानाबाहेर निदर्शनेही केली. तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करत दुकानदारांना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहतुकीचा खर्च प्रचंड वाढल्याचे सांगत दुकानदारांनी आपली असमर्थता दर्शविली. दरम्यान, सरकारने काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.