अयोध्येत KFC च्या आऊटलेटचा मार्ग मोकळा; फक्त पाळावी लागेल 'ही' एक अट

KFC Branch In Ayodhya: 22 जानेवारीपासून दिवसोंदिवस अयोध्येला येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढताना दिसत आहे. एका दिवसात 2 ते 3 लाख पर्यटक येत असलेल्या अयोध्येमध्ये नवीन कंपन्यांना आपली आऊटलेट सुरु करायची असून यात केएफसीचाही समावेश आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 8, 2024, 09:26 AM IST
अयोध्येत KFC च्या आऊटलेटचा मार्ग मोकळा; फक्त पाळावी लागेल 'ही' एक अट title=
जिल्हाधिकाऱ्यांनी यावर नोंदवलं मत

KFC Branch In Ayodhya: रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून अयोध्या जागतिक स्तरावर पर्यटन केंद्र म्हणून चर्चेत आलं आहे. भारताबरोबरच जगभरातील अनेक नामांकित कंपन्यांसाठी सध्या अयोध्येमध्ये पायघड्या घातल्या जात आहेत. बऱ्याच कंपन्यांनी भविष्याचा विचार करुन स्वत:हून अयोध्येत आपली ब्रँच सुरु करण्यासाठी हलचाली सुरु केल्या आहेत. सध्या दिवसाला 2 ते 3 लाख पर्यटक अयोध्येला भेट देत आहेत. 22 जानेवारीपासून दिवसोंदिवस इथं येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढताना दिसत आहे.

घातली एक अट

अयोध्येत मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने त्यांच्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा ज्यामध्ये हॉटेल, रेस्तराँ, राहण्याची सोय यासारख्या सुविधा पुरवणाऱ्या गोष्टींची मागणी वाढली आहे. या ठिकाणी नाश्ता, जेवण यासारख्या गोष्टींची सुविधा पुरवणाऱ्यांची मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेण्याची तयारी अनेक नामांकित कंपन्यांकडून केली जात आहे. अयोध्येमध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनी केएफसीलाही ब्रँच सुरु करायची आहे. आपल्या मांसाहारी पदार्थांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या केएफसीला अयोध्येमध्ये ब्रँच सुरु करता येईल असं सांगण्यात आलं असलं तरी यासाठी एक महत्त्वाची अट घालण्यात आली आहे.

हा बदल करावा लागणार

अयोध्येचे जिल्हाधिकारी नितीश कुमार यांच्याकडे केएफसीच्या आऊटलेटसंदर्भात विचारणा करण्यात आली. यावर उत्तर देताना नितीश कुमार यांनी, केएफसीसहीत सर्वच ब्रॅण्ड्सचं अयोध्येमध्ये स्वागत असून कोणतीही कंपनी इथं आऊटलेट उघडू शकते. मात्र अयोध्येत ज्या ठिकाणी मांसाहार आणि मद्य विक्रीवर बंदी आहे अशा भागांत या कंपन्यांनी दुकाने सुरु केल्यास त्यांना हे निर्बंध पाळावे लागतील. त्यानुसार त्यांना त्यांच्या मेन्यूमध्ये बदल करावा लागणार असल्याचं सांगितलं.

हा नियम पाळावा लागणार

म्हणजेच केएफसीसारख्या कंपन्यांनी अयोध्येतील प्रतिबंधित भागामध्ये आऊटलेट सुरु केलं तरी त्यांना या ठिकाणी मांसाहारी पदार्थ विकता येणार नाहीत. निर्बंध नसलेल्या अयोध्येतील इतर भागांमध्ये आऊटलेट सुरु केलं तर तिथे मांसाहारी पदार्थ विकण्यास परवानगी आहे. त्यामुळे तिथे त्यांना त्यांचे मांसाहारी पदार्थ पाठवता आणि विकता येतील, असं नितीश कुमार म्हणाले. प्रतिबंधित भाग वगळता इतर कुठेही केएफसीला व्यवसाय करता येईल असं यामधून स्पष्ट झालं आहे.

इतरही कंपन्या येणार

केएफसीबरोबरच बर्गरकिंग, मॅकडोनाल्ड यासारख्या ब्रॅण्डची ओळख त्यांच्या मांसाहारी पदार्थांची विक्रीमुळे असली तरी भारतात हे सर्व ब्रॅण्ड शाकाहारी पदार्थही फार मोठ्या प्रमाणात विकतात. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात त्यांना मर्यादित मेन्यूसहीत उद्योग-व्यवसाय करावा लागेल तर या क्षेत्राबाहेर सामान्यपणे सर्व प्रोडक्टची विक्री करता येईल.