'मी तर उद्धव ठाकरेंचं सिंहासनही...,' प्रचारसभेत कंगनाचं जाहीर विधान, म्हणाली 'तुमची औकात काय?'

LokSabha Election: हिमाचल प्रदेशातून (Himachal Pradesh) निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या कंगना रणौतने (Kangana Ranaut) काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी तुमची असे हाल करेन की भाजी मार्केटमधील भाज्यांचे दरही विसरुन जाल असं कंगना म्हणाली आहे.   

शिवराज यादव | Updated: May 22, 2024, 09:53 AM IST
'मी तर उद्धव ठाकरेंचं सिंहासनही...,' प्रचारसभेत कंगनाचं जाहीर विधान, म्हणाली 'तुमची औकात काय?' title=

LokSabha Election: हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मंडी लोकसभा मतदारसंघासाठी 1 जूनला मतदान होणार आहे. मतदानाची तारीख जवळ येत असल्याने सर्वच उमदेवार प्रचारासाठी जोर लावत आहेत. यादरम्यान भाजपा उमेदवार कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. त्यातच आता कंगनाने विक्रमादित्य (Vikramaditya Singh) यांना जाहीर इशारा दिला आहे. 

कंगनाने विक्रमादित्य यांना जाहीर आव्हान दिलं आहे. "हे लोक मंडीच्या लेकींचा भाव विचारत आहेत. यांनी मंडीच्या मुलींना अपवित्र म्हटलं आहे. मंडीच्या मुलींचा भाव विचारला. पण आता आम्ही मंडीच्या लेकींचा अपमान सहन करणार नाही. मी तर म्हणते डोंगरावरील महिलांमध्ये फार दम असतो. मी तर उद्धव ठाकरेंचं सिंहासनही हलवलं होतं. तुमची काय औकात आहे," असं कंगना रणौत म्हणाली आहे. 

कंगनाने विक्रमादित्य यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटलं की, "तुम्ही मंडीच्या मुलींचे भाव विचारले. मी तुमची अशी हालत करेन की तुम्ही भाजी मार्केटमधील भाज्यांचे भावही विसरुन जाल. हे कुटुंब कित्येक वर्षांपासून खुर्चाला चिकटून बसलं आहे. या लोकांकडे सत्ता होती, तरीही यांची भूक कमी होत नाही. ही सत्तेची भूकच त्यांनी घेऊन बुडेल. लोकांचा पैसा खाण्यासाठी या लोकांना सत्ता हवी आहे". 

पुढे तिने म्हटलं की, "मी पद्मश्री, फिल्ममेकर आहे. मी स्वत: कमवते. पण विक्रमादित्य काही कामाचे नाहीत. ते केवळ आई-वडिलांच्या नावे मतं खातात. यांच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचारी कोणीच नाही".

कंगना आणि विक्रमादित्य यांच्याच लढत

हिमालच प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार कंगना रणौतचा सामना काँग्रेसच्या विक्रमादित्य यांच्याशी होणार आहे. येथे 1 जूनला मतदान होणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. विक्रमादित्य यांनी कंगनावर टीका करताना गोमांस खाण्यासंबंधी भाष्य केलं होतं. "हिमाचल देवी-देवतांची पवित्र जागा आहे. ही देवभूमी आहे. येथे गोमांसचं सेवन कऱणारे निवडणूक लढत आहेत हा संस्कृतीसाठी चिंतेचा विषय आहे".

कंगनाने यावर प्रत्युत्तर देताना आपण गोमांस खात नसल्याचं उत्तर दिलं होतं. हे फार निंदनीय आहे. माझ्याविरोधात उगाच अफवा पसरवल्या जात आहेत. मी अनेक वर्षांपासून योग आणि आयुर्वेदचं समर्थन, प्रमोशन करत आहे. आता माझी प्रतिमा मलीन केल्याने अशा रणनितीवर काही परिणाम होणार नाही. मी एक अभिमानी हिंदू आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यांची कोणी दिशाभूल करु शकत नाही असं कंगनाने म्हटलं आहे.