तब्बल 8.49 कोटी लुटणारी 'डाकू हसीना' 10 रुपयांच्या फ्रुटीमुळे पोलिसांच्या जाळ्यात; फिल्मी स्टाईलनं रचला सापळा

Punjab Crime : 'डाकू हसीना' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मनदीप कौरला पंजाब पोलिसांनी 8 कोटी 49 लाख रुपयांच्या लुटमारीसाठी अटक केली आहे. 10 रुपयांची फ्रुटी पिण्याच्या नादात मनदीप पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. पोलिसांनी मनदीप आणि तिच्या पतीला अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 19, 2023, 12:34 PM IST
तब्बल 8.49 कोटी लुटणारी 'डाकू हसीना' 10 रुपयांच्या फ्रुटीमुळे पोलिसांच्या जाळ्यात; फिल्मी स्टाईलनं रचला सापळा title=

Crime News : पंजाबच्या (Punjab Police) लुधियाना (Ludhiana loot case) जिल्ह्यातील सीएमएस कंपनीत 8.49 कोटींचा सर्वात मोठा दरोडा टाकणारी मुख्य आरोपी डाकू हसीना उर्फ ​​मनदीप कौर आणि तिच्या पतीला अटक करण्यात पंजाब पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी (Punjab Police) मनदीप कौर आणि तिच्या पतीला उत्तराखंडमधून (Uttarakhand) अटक केली आहे. पंजाबच्या पोलीस महासंचालक ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. गुन्हा केल्यानंतर मनदीप कौर तीर्थयात्रेला गेली होती. यात्रेत हजारोंच्या संख्येने असलेल्या हसीनाचा शोध घेणे पोलिसांसाठी सोपे नव्हते. मात्र 10 रुपयांची फ्रूटी पिण्याच्या नादात ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.

10 जून रोजी पंजाबमधील लुधियाना येथे 8.49 कोटी रुपयांच्या दरोड्याप्रकरणी मास्टरमाइंड मनदीप कौर तिच्या पतीसह अटक करण्यात आली आहे. मनदीप कौर आणि तिचा पती जसविंदर सिंग या दोघांना उत्तराखंडमधील चमोली येथील हेमकुंड साहिबला जात असताना अटक करण्यात आली आहे. दरोडा यशस्वी झाला म्हणून देवाचे आभार मानन्यासाठी मनदीप हेमकुंड साहिबला गेली होती. दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 21 लाख रुपये जप्त केले आहेत. 10 रुपयांची मोफत फ्रूटी मिळवण्याच्या नादात मनदीप पकडली गेली आहे. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 12 पैकी 9 आरोपींना अटक केली आहे.

10 जून रोजी काही सशस्त्र दरोडेखोरांनी लुधियानाच्या न्यू राजगुरू नगर भागातील सीएमएस सिक्युरिटीज कार्यालयात सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि 8.49 कोटी रुपयांची रोकड लुटून नेली होती. पोलिसांनी 100 तासांच्या आत मुख्य सुत्रधार असलेल्या मनदीपला अटक केली आहे.  ​​मनदीप कौर ही मूळची लुधियानाचीच होती. मनदीपची आई लोकांच्या घरात साफसफाईचे काम करायची. मनदीपची आई ही एक मेहनती महिला आहे. लहान भाऊ हरप्रीत याला मनदीपने श्रीमंत होण्याचे स्वप्ने दाखवून दरोड्याच्या घटनेत सामील करुन घेतले. लुटीच्या पैशाचे तिन हिस्से मनदीपला मिळाले होते.

कशी अडकली जाळ्यात?

मनदीप कौर आणि तिचा पती जसविंदर सिंग नेपाळला पळून जाणार असल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती. नेपाळला जाण्यापूर्वी त्यांनी हरिद्वार, केदारनाथ आणि हेमकुंड साहिबची यात्रा करण्याचेही ठरवले होते. दोघेही यात्रेला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र हजारो भाविकांच्या गर्दीत त्या दोघांना शोधणे अवघड होते. म्हणून पोलिसांनी एक सापळा रचला आला भाविकांना मोफत फ्रुटी वाटण्यास सुरुवात केली. इतर भाविकांप्रमाणेच मनदीप आणि तिचा पती पोलिसांच्या स्टॉलवर पोहोचले. कोणी ओळखू नये म्हणून त्यांना तोंड झाकलं होतं. मात्र फ्रुटी पिण्यासाठी त्यांनी चेहरा उघडला आणि पोलिसांनी त्यांना ओळखले. मात्र पोलिसांनी त्यांना लगेच अटक केली नाही.

दरम्यान, पोलिसांनी दोघांनाही आधी हेमकुंड साहिब येथे नतमस्तक होऊ दिले आणि त्यानंतर अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या सापळ्याला 'चलो रानी मधुमक्खी को पकड़ते हैं' असे नाव दिले होते.