जालन्यात पाणीटंचाई, टँकर आणि जायकवाडी योजनेवर शहरवासियांची मदार

उन्हाच्या वाढत्या कडक्यामुळे जलस्रोत आटल्याने पाण्याची समस्या अधिक चिघळली

Updated: Jun 3, 2019, 03:18 PM IST
जालन्यात पाणीटंचाई, टँकर आणि जायकवाडी योजनेवर शहरवासियांची मदार title=

जालना : जालना शहरातील जुना जालना भागाला पाणीपुरवठा करणारा घानेवाडी तलाव कोरडा पडला आहे. त्यामुळे जालना शहरातील नागरीक पाण्याच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. आता शहरातील नागरीकांची तहान टँकरसह जायकवाडी योजनेच्या पाण्यावर अवलंबून आहे.जालना शहरातील नागरीक पाण्यासाठी व्याकुळ झालेत.कारण शहरातील जुना जालना भागाला पाणीपुरवठा करणारा घानेवाडी जलाशय आता कोरडाठाक झाला आहे. तलावात शहरातील नागरीकांची गरज भागेल असा पाणीसाठा राहिलेला नाही. त्यामुळे गेल्यावर्षी 20 फुटापेक्षा जास्त पाणीसाठा असलेला हा तलाव आज कोरडा पडला.त्यामुळे शहराला या तलावातून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे.

त्यामुळे शहरातील नागरीकांना 60 पेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. शिवाय शहराची तहान जायकवाडी योजनेवर अवलंबून आहे. जालना शहराला जायकवाडीतुन सध्या 24 एम.एल.डी.पाण्याचा उपसा होतो. त्यातून 4 एम.एल.डी. पाणी अंबड शहराला दिल्या जातं. म्हणजे 20 एम.एल.डी.पाणी जालना शहराला मिळत.पण अंबड ते जालना दरम्यान असलेल्या जायकवाडी योजनेच्या व्हॉल्व्हला ठिकठिकाणी गळती लागल्यानं 2 एम.एल.डी.पाणी वाया जाते. परीणामी 18 एम.एल.डी.पाणी शहराला मिळत.पण संपूर्ण शहराअंतर्गत पाणीपुरवठा करणारी निजामकालीन पाईपलाईन काढून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून ते प्रगती पथावर आहे. शिवाय जलकुंभ देखील उभारण्याचे काम प्रस्तावित आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाहीय. त्यामुळे शहरांतर्गत पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून शहरात पाण्याची अशीच अवस्था आहे. मात्र उन्हाच्या वाढत्या कडक्यामुळे जलस्रोत आटल्याने पाण्याची समस्या अधिक चिघळत चालली असली तरी शहरवासीयांना या परिस्थितीत टँकरच्या पाण्यावरच तहान भागवल्याशिवाय पर्याय नाही.