लखनऊ: बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती यांनी मंगळवारी ६३ व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त बसपाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी अमरोहा येथील कार्यक्रमात केक खाण्यासाठी लोकांनी केलेल्या गर्दीमुळे प्रचंड गोंधळ उडाला. या प्रसंगाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी एका टेबलवर केक ठेवलेला केक लोकांना देण्यात येत होता. मात्र, लोक केक खाण्यासाठी इतके अधीर झाले होते की, जमाव या केकवर अक्षरश: तुटून पडला. कार्यकर्त्यांनी लोकांना आवरण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, कोणीच ऐकायला तयार नव्हते. अनेक लोक वाटेल तसा हात मारून केक तोडून नेत होते. काहीजण तर एवढ्या गर्दीतही केक ताटलीत भरून घेण्याचा प्रयत्न करत होते. हा सर्व प्रकार पाहून आयोजकांची हसू की रडू, अशी अवस्था झाली. मात्र, सोशल मीडियावर हा व्हीडिओ अनेकांचे मनोरंजन करत आहे.
#WATCH: People loot cake during an event in Amroha, on Bahujan Samaj Party (BSP) chief Mayawati's 63rd birthday today. pic.twitter.com/8Q4bDWdr66
— ANI UP (@ANINewsUP) January 15, 2019
तत्पूर्वी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी आज सकाळी मायावती यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. गेल्याच आठवड्यात अखिलेश यादव आणि मायावती यांनी आगामी लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर मायावती यांनी सपा आणि बसपच्या कार्यकर्त्यांना जुने वाद विसरून एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. हीच माझ्या वाढदिवसाची सर्वात मोठी भेट असेल, असे मायावती यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. त्यापैकी ३८-३८ अशा समान जागांवर सपा आणि बसपाचे उमेदवार निवडणूक लढवतील. तर दोन जागा मित्रपक्षांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. तर रायबरेली व अमेठी या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात निवडणूक न लढवण्याचा निर्णय सपा-बसपाच्या युतीने घेतला होता.