Petrol Diesel Price : ताजमहाल नसता तर पेट्रोल 40 रुपये लिटर असतं : असदुद्दीन ओवेसी

ताजमहाल बांधला नसता, तर आज पेट्रोलचे भाव इतके वाढले नसते, जाणून घ्या ओवेसी असं का म्हणाले.   

Updated: Jul 5, 2022, 07:59 PM IST
Petrol Diesel Price : ताजमहाल नसता तर पेट्रोल 40 रुपये लिटर असतं : असदुद्दीन ओवेसी  title=

Petrol Diesel Price : खासदार आणि एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी पेट्रोलच्या वाढत्या किंमतीसाठी ताजमहालला जबाबदार धरलंय. ताजमहाल बांधला नसता, तर आज पेट्रोलचे भाव इतके वाढले नसते, असा टोला लगावला. शहाजहानने ताजमहाल बांधला नसता तर आज पेट्रोलची किंमत 40 रुपये लिटर असती, अशी उपरोधिक टीका ओवेसी यांनी केली. (mim chief and mp asaduddin owaisi blames taj mahal for rising petrol prices) 

ताजमहालमुळे पेट्रोल महाग?

ओवेसी यांनी देशातील सर्व समस्यांसाठी मुघल आणि मुस्लीम जबाबदार असल्याचा आरोप लगावला. "देशात तरुण बेरोजगार आहेत. महागाई वाढते, डिझेल 102 रुपये लीटर आहे. प्रत्यक्षात पंतप्रधान नाही, तर यासाठी औरंगजेब जबाबदार आहेत. बेरोजगारीसाठी सम्राट अकबर जबाबदार है. पेट्रोलची ₹104-₹115 लीटरने विक्री केली जातेय, यासाठी ज्याने ताजमहाल बनवलाय तो जबाबदार आहे", असा खोचक टोला ओवेसी यांनी लगावला.

...तर आज पेट्रोल 40 रुपये लिटर

"शाहजहानने ताजमहाल बांधला नसता तर आज पेट्रोल 40 रुपये लिटरने मिळालं असतं. आदरणीय पंतप्रधानजी, ताजमहाल आणि लाल किल्ला बांधून शहाजहानने चूक केली हे मला मान्य आहे. त्याने ते पैसे साठवून ते सुपूर्द करायला हवे होते. ते पैसे 2014 मध्ये ते मोदींकडे सोपवायला हवे होते. प्रत्येक मुद्द्यावर ते म्हणतात की मुस्लिम जबाबदार आहेत, मुघल जबाबदार आहेत", असंही ओवेसी यांनी नमूद केलं.

भारतावर फक्त मुघलांचेच राज्य होतं का?

दरम्यान औवेसी यांनी आक्रमक होत आणखी काय प्रश्न उपस्थित केले. "भारतावर फक्त मुघलांचे राज्य होते का? सम्राट अशोक आणि चंद्रगुप्त मौर्या यांनी राज्य केलं नाही का, पण भाजप फक्त मुघलांकडेच पाहू शकते. ते एका डोळ्याने मुघलांना पाहतात, तर दुसऱ्या डोळ्याने पाकिस्तानला", अशा शब्दात ओवेसी यांनी घणाघात केला.
 
"भारतातील मुस्लिमांचा मुघल किंवा पाकिस्तानशी काहीही एक संबंध नाही. आम्ही मोहम्मद अली जिना यांचा प्रस्ताव नाकारला होता. यावर्षी स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. या देशातील 200 कोटी मुस्लिम साक्षीदार आहेत की त्यांच्या पूर्वजांनी जिनांचा प्रस्ताव नाकारला आणि भारतातच राहिले", असंही ओवेसी या स्पष्ट केलं. 

आम्ही इथेच राहणार आणि इथेच मरणार

"भारत हा आपला प्रिय देश आहे. आम्ही भारत सोडणार नाही. तुम्ही हव्या तेवढ्या घोषणा द्या, आम्हाला जायला सांगा. आपण इथेच जगणार आणि इथेच मरणार", असं ठामपणे ओवेसी यांनी सांगितलं.