मिर्झापूरच्या 'गुगल आजी', पंतप्रधान मोदींनीही केलंय कौतुक

आजी नव्हे, त्या तर चालतीफिरती टेलिफोन डिरेक्टरी

Updated: Feb 23, 2021, 10:44 PM IST
मिर्झापूरच्या 'गुगल आजी', पंतप्रधान मोदींनीही केलंय कौतुक title=

मिर्झापूर : तुम्हाला मिर्झापूर माहीत असेलच. तिथं एक आज्जी राहतात. 65 वर्षांच्या.. त्यांचं नाव सीतापती पटेल. वय झालं की, अनेकांना विस्मृतीचा आजार जडतो. पण मिर्झापूरच्या परस रामपूर भागात राहणाऱ्या ६५ वर्षांच्या सीतापती पटेल याला अपवाद आहेत. कारण वाढत्या वयासोबत त्यांची स्मरणशक्ती देखील वाढतच चालली आहे. केवळ त्यांच्याच जिल्ह्याच्या नव्हे, तर अगदी आजुबाजूच्या जिल्ह्यातल्या नेत्यांचे आणि सरकारी अधिकाऱ्यांचे मोबाईलन नंबर त्यांना तोंडपाठ आहेत. 

आपल्यापैकी अनेकांना आपल्या घरातल्या लोकांचे मोबाईल नंबर आठवत नाहीत. पण गुगल आजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीतापतीबाईंना पोलीस स्टेशन आणि हेल्पलाईनचे नंबर देखील पाठ आहेत. एखादी गोष्ट शोधायची झाली की आपण गुगलचा आधार घेतो.. मिर्झापूरचे लोक गुगल आजींना शोधतात. विशेष म्हणजे या गुगल आजी अशिक्षित आहेत. पण कोणताही नंबर त्यांना एकदा सांगितला की, तो त्यांना तोंडपाठ होतो. स्थानिक गावकऱ्यांना त्या मदत करतात.

गुगल आजींच्या या आगळ्यावेगळ्या गुणाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील कौतुक केलंय. स्वभावानं हंसमुख आणि जिंदादिल असलेल्या गुगल आजींनी स्वच्छ भारत मिशनसाठी खास गाणं देखील तयार केलंय... त्या स्वतः ते गाणं म्हणत स्वच्छतेचा संदेश देतात.