बेपत्ता, खंडणी आणि हत्या: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, ड्रग्ज विकणाऱ्या गँगने मागिली होती खंडणी

अरफातच्या कुटुंबाला 19 मार्चला एका अज्ञात व्यक्तीकडून फोन आला होता. ड्रग्जची विक्री करणाऱ्या टोळीने अरफातचं अपहरण केलं असून, 1200 डॉलर्सची मागणी करण्यात आली होती.   

शिवराज यादव | Updated: Apr 9, 2024, 02:42 PM IST
बेपत्ता, खंडणी आणि हत्या: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, ड्रग्ज विकणाऱ्या गँगने मागिली होती खंडणी title=

अमेरिकेत आणखी एका बेपत्ता भारतीय तरुणाचा मृतदेह आढळला आहे. 25 वर्षीय मोहम्मद अब्दुल अरफात मागील महिन्यात बेपत्ता झाला होता. अमेरिकेतील भारतीय दुतावासाने प्रशासनाच्या मदतीने त्याचा शोध घेतला जात असल्याचं सांगितलं होतं. पण काही आठवड्यानंतर त्याचा मृतदेह आढळला होता. ओहिओ येथील क्लीव्हलँड येथे त्याचा मृतदेह हाती लागला आहे. 

“मोहम्मद अब्दुल अरफात याची शोधमोहीम सुरु असताना क्लीव्हलँड येथे तो मृतावस्थेत आढळल्याने फार दुःख झालं आहे. मोहम्मद अरफातच्या कुटुंबाप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करत आहोत,” असं न्यूयॉर्क येथील भारतीय दूतावासाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

मोहम्मद अब्दुल अरफातच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी आपण स्थानिक यंत्रणांच्या संपर्कात आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे. पार्थिव भारतात नेण्यासाठी आम्ही शोकाकूल कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत आहोत अशी माहितीही त्यांनी एक्सवर दिली आहे. 

मोहम्मद अब्दुल अरफात मूळचा हैदराबादचा होता. क्लीव्हलँड विद्यापीठात आयटीमधून मास्टर्स करण्यासाठी तो गतवर्षी मे महिन्यात अमेरिकेत दाखल झाला होता. कुटुंबाचा त्याच्याशी संपर्क होत नसल्याने तो बेपत्ता झाल्याचा संशय आला होता. 7 मार्चला कुटुंबाचं त्याच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं. पीटीआयच्या वृत्तानुसार, अफरातच्या कुटुंबाला 19 मार्चला एका अज्ञात व्यक्तीकडून फोन आला होता. त्याने अराफतचं ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीने अपहरण केल्याचा दावा केला. तसंत त्याची सुटका करण्यासाठी 1200 अमेरिकन डॉलर्सची मागणी केली. 21 मार्च रोजी, भारताच्या वाणिज्य दूतावासाने त्याला लवकरात लवकर शोधण्यासाठी अरफातचं कुटुंब आणि अमेरिकेतील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत अशी माहिती दिली होती. 

अरफातच्या निमित्ताने अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याने जीव गमावला आहे. 5 एप्रिल रोजी, भारतीय वाणिज्य दूतावासाने क्लिव्हलँड येथे उमा सत्य साई गडदे याच्या मृत्यूची माहिती दिली होती. 18 मार्च रोजी बोस्टनमधील भारतीय विद्यार्थी अभिजीत परुचुरु याचं निधन झालं. 1 फेब्रुवारी रोजी ओहायोमध्ये श्रेयस रेड्डी बेनिगेरी हा भारतीय वंशाचा विद्यार्थी मृतावस्थेत आढळला होता.

पर्ड्यू युनिव्हर्सिटीत समीर कामथ हा 23 वर्षीय विद्यार्थी 5 फेब्रुवारी रोजी इंडियाना येथील निसर्ग संवर्धनामध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. तसंच 25 वर्षीय विवेक सैनी याची एका बेघर व्यक्तीने हत्या केली होती.