Mohan Bhagwat: भारतात मुस्लिमांना कोणताही धोका नाही, पण....मोहन भागवतांच्या वक्तव्याने खळबळ

RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियतकालीकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये हिंदुस्तान हा हिंदुस्तानच राहायला हवा असे म्हणताना मोहन भागवत यांनी मुस्लीम बांधवांना सल्ला देखील दिला आहे. मोहन भागवत यांनी दिलेल्या सल्ल्यावरुन आता प्रतिक्रिया समोर येत आहेत  

Updated: Jan 11, 2023, 01:22 PM IST
Mohan Bhagwat: भारतात मुस्लिमांना कोणताही धोका नाही, पण....मोहन भागवतांच्या वक्तव्याने खळबळ title=

RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी केलेले एक विधान सध्या जोरदार चर्चेत आहे. भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना (Indian Muslims) घाबरण्याची गरज नाही असे संघ प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले आहे. यासोबत मोहन भागवत यांनी भारतातील मुस्लिमांना एक सल्लाही दिल आहे. मुस्लीम बांधवांनी आपल्या श्रेष्ठत्वाशी संबधित विधाने करणे सोडले पाहिजे, असे मोहन भागवत म्हणाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नियतकालिक ऑर्गनायझर आणि पांचजन्य यांना दिलेल्या मुलाखतीत मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केले आहे.

हिंदू संस्कृती वाचवण्यासाठी देशातल्या शत्रूंविरोधात युद्ध

"भारत आणि इतर देशांतील हिंदूंमध्ये नवीन आक्रमकता हिंदू समाज 1000 वर्षांहून अधिक काळ युद्धात असल्यामुळे आणि शेवटी संघाच्या पाठिंब्याने जागृत झाल्यामुळे आली आहे. हिंदू समाज आणखी एका युद्धाच्या मध्यावर आहे. मात्र हे युद्ध कोणत्याही बाहेरच्या शत्रूविरुद्ध नाही, तर आपल्याच देशात सध्या असलेल्या शत्रूविरुद्ध आहे. हे युद्ध हिंदू समाज, हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती वाचवण्यासाठी लढले जात आहे. यामध्ये परकीय आक्रमक नाहीत, पण परकीय षड्यंत्र आणि परकीय प्रभाव नक्कीच आहे. हे युद्ध असल्याने लोक अतिउत्साही होऊन  प्रक्षोभक विधाने केली जाण्याची शक्यता आहे," असे मोहन भागवत म्हणाले.

आपण मोठे असा विचार करणं मुस्लिमांनी सोडून द्यावा

"साधं सरळ सत्य हे आहे की हिंदुस्तान हा हिंदुस्तानच राहिला पाहिजे. आज भारतात राहणाऱ्या मुस्लिमांचे काहीही नुकसान होत नाही. इस्लामला देशात कोणताही धोका नाही, आपणच मोठे आहोत. यापूर्वीही आपण या देशावर राज्य केले होते आणि आम्ही पुन्हा या देशावर राज्य करू, फक्त आपला मार्ग बरोबर आहे, बाकी सर्व चुकीचे आहेत. आम्ही वेगळे आहोत, म्हणून आम्ही असेच राहू. त्यामुळे आम्ही एकत्र राहू शकत नाही, असा विचार मुस्लिमांनी करणं सोडून द्यावा," असेही मोहन भागवत म्हणाले.

दुसरीकडे, मोहन भागवत यांच्या विधानावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी, मुस्लिमांना भारतात राहू देण्याचा किंवा आमचा धर्म पाळण्याचा अधिकार देणारे मोहन भागवत कोण आहेत?  एवढेच नाही तर अल्लाहची इच्छा होती, म्हणूनच आम्ही भारतीय आहोत, असे म्हटले आहे.

राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनीही मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला. "हिंदुस्तान हा हिंदुस्तानच राहिला पाहिजे हे मला मान्य आहे. पण माणसानेही माणूसच राहिले पाहिजे," असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.