नेवाळीत हिंसक वळणानंतर नौदलाला तात्पुरते काम थांबवण्याच्या सूचना

नेवाळीत पेटलेल्या संघर्षानंतर नौदलाला तात्पुरते काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली.

Updated: Jun 22, 2017, 08:13 PM IST
नेवाळीत हिंसक वळणानंतर नौदलाला तात्पुरते काम थांबवण्याच्या सूचना title=

नवी दिल्ली : नेवाळीत पेटलेल्या संघर्षानंतर नौदलाला तात्पुरते काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली.

याप्रकरणी येत्या २९ जूनला विस्तारीत बैठक बोलावण्यात आली आहे. त्या बैठकीत कागदपत्रांसह जमिनिचे सर्व पुरावे नव्याने तपासण्यात येतील. त्यावेळी कागदपत्रांच्या आधारे जे समोर येईल ते सर्वांनी मान्य करावे, असा तोडगा त्यांनी सुचवला आहे.

नेवाळी विमानतळाविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आहे. त्याआधी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. तर काही ठिकाणी जाळपोळही झाली. काही ठिकाणी पोलीसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. 

स्थानिक आमदारांनी शांततेचं आवाहन करूनही शेतकऱ्यांचा प्रक्षोभ कमी झालेला नाही. भाल गावात अखेर उग्र आंदोलकांना परत फिरवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे. कल्याणजवळ विमानातळासाठी केंद्र सरकारानं जबरदस्ती जमीन संपादित केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सरकारच्या जमिनी संपादनाविरोधात केलेल्या आंदोलनाला आज सकाळी हिंसक वळण लागलं. मालकीच्या जमिनीवर पेरणी करण्यास मज्जाव केल्यानं शेतक-यांचा संताप टोकाला गेल्याचं पुढे येतं आहे. आंदोलनादरम्यान शेतक-यांनी कल्याण-मलंगड रस्त्यावर टायर जाळून वाहतूकही बंद पाडली.