डॉक्टरांनी सांगितलं ऊन दाखवा, पालकांनी अर्धा तास बाळाला कडकडीत उन्हात ठेवलं अन्...

Trending News Today: नवजात बाळाला अर्धा तास उन्हात ठेवले. मात्र, कडक उन्हामुळं या बाळाचा मृत्यू झाला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 16, 2024, 01:12 PM IST
डॉक्टरांनी सांगितलं ऊन दाखवा, पालकांनी अर्धा तास बाळाला कडकडीत उन्हात ठेवलं अन्... title=
newborn died after family kept in sunlight Doctor absconding

Trending News Today:  नवजात बाळांचे संगोपन करणे हे खूप अवघड असते. लहान मुलांचा संभाळ डोळ्यात तेल घालून करावा लागतो. त्यांना काय त्रास होतोय यांचा आंदाज आपल्यालाच बांधावा लागतो. म्हणूनच नवजात बाळांची काळजी घेणे खूप अवघड असते. उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंबीयांनी 5 दिवसांच्या मुलीला उन्हात ठेवलं. त्यामुळं त्या मुलीचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांचा दावा आहे की, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांनी मुलीला उन्हात ठेवलं. तर, तिच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा दावा केला आहे. तर, मुलीच्या मृ्त्यूनंतर डॉक्टरही रुग्णालयसोडून फरार झाला आहे. सध्या अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार खासगी रुग्णालय सील करण्यात आले आहे. 

संपूर्ण प्रकरण घिरोर ठाणे परिसरातील आहे. येथील रहिवाशी विमलेश कुमारच्या पत्नीने शहरातील साई रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला. मुलीची प्रकृती थोडी नाजूक होती. त्यामुळं डॉक्टरांनी मुलीला अर्धा तास उन्हात ठेवण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, कुटुंबीयांनी मुलीला साधारण 11.30 वाजता रुग्णालयाच्या गच्चीवर उन्हात ठेवले. 

कुटुंबीयांनी मुलीला उन्हात तर ठेवले मात्र, कडक उन्हाळा असल्याने काहीच वेळात मुलीची तब्येत बिघडली. त्यानंतर 12 वाजता कुटुंबीय तिला उन्हातून खाली घेऊन गेले. मात्र, त्यानंतर थोड्याच वेळात मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी संतप्त प्रतिक्रिया देत रुग्णालयातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून डॉक्टर रुग्णालय सोडून फरार झाले आहेत. 

आरोप आहे की, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मयत मुलीच्या आईलाही रुग्णालयाबाहेर काढले. पीडीत कुटुंबीयांच्या आरोपांनुसार, मैनपुरीच्या सीएमओ डॉ आरसी गुप्ता यांनी एक पथक पाठवून संपूर्ण रुग्णालय सील केले आहे. तसंच, या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तर या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतरच नेमकं काय घडलं आहे याचे कारण समोर येणार आहे. मात्र, अवघ्या काही दिवसांपूर्व जन्मलेल्या मुलीचा अशाप्रकार मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, मुलीच्या आई-वडिलांनाही मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच संपूर्ण प्रकरण समोर येणार आहे.