पुढचे ७२ तास जास्त महत्त्वाचे, पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांची दर्पोक्ती

नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय हद्दीमध्ये पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

Updated: Feb 27, 2019, 02:31 PM IST
पुढचे ७२ तास जास्त महत्त्वाचे, पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांची दर्पोक्ती title=

नवी दिल्ली - नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय हद्दीमध्ये पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. त्यातच पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांनी पुढचे ७२ तास जास्त महत्त्वाचे आहेत, अशी दर्पोक्ती केली आहे. दुसऱ्या महायुद्धासारखी स्थिती निर्माण होऊ शकते, असेही शेख रशीद यांनी म्हटले आहे. पण पाकिस्तानच्या लष्कराचे अधिकारी असिफ गफूर यांनी मात्र आम्हाला युद्ध नको असे विधान केले आहे. दोघांनी दोन स्वतंत्र विधाने केल्यामुळे पाकिस्तानमध्ये वरिष्ठ पातळीवर अद्याप गोंधळाचे वातावरण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून मंगळवारी पहाटे बालकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या तळांवर हल्ला चढवला. त्यानंतर पाकिस्तानकडून बुधवारी सकाळी लढाऊ विमाने भारतीय हद्दीत घुसवण्यात आली. या पैकी एक विमान भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाडले. एफ १६ जातीची लढाऊ विमाने नौशेरा, राजौरीपर्यंत आल्यानंतर भारतीय विमानांनी त्यांना प्रत्युत्तर देत परतावून लावले. यावेळी पाकिस्तानचे एक विमानही पाडण्यात आले. 

पाकिस्तानने त्यांच्या सर्व विमानतळावरील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक स्थगित केली आहे. लढाऊ विमानांना अधिकाधिक इंधन उपलब्ध व्हावे, यासाठी प्रवासी विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे भारतानेही लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट, डेहराडून, अमृतसर, चंदीगड आणि जम्मू विमानतळांवरील विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात थांबवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक होत असून, या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गुप्तचर यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. विज्ञान भवनात सुरू असलेला एक कार्यक्रम आटोपता घेऊन नरेंद्र मोदी या बैठकीसाठी रवाना झाल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.