पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून पत्नीने केली आत्महत्या; अंत्यसंस्कारानंतर जिवंत सापडल्याने एकच खळबळ

ओडिशात पतीच्या निधनाचे वृत्त सहन न झाल्याने पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत महिलेचा पती जिवंत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आकाश नेटके | Updated: Jan 6, 2024, 04:31 PM IST
पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून पत्नीने केली आत्महत्या; अंत्यसंस्कारानंतर जिवंत सापडल्याने एकच खळबळ title=

Shocking News : ओडिशामध्ये डॉक्टरांच्या चुकीमुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीमुळे महिलेने आत्महत्येचे पाऊल उचललं आहे. पतीच्या निधनाची माहिती मिळताच पत्नीने आत्महत्येचा मार्ग स्विकारला. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या निधनाची चुकीची माहिती पत्नीला देण्यात आली होती. पतीच्या निधनाचे वृत्त कळताच पत्नीने स्वतःचीही जीवनयात्रा संपवली आहे. या सगळ्या प्रकारामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ओडिशाच्या खोरधा जिल्ह्यात स्फोटात पतीचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून पत्नीला धक्का बसला आणि तिने आत्महत्या केली. महिलेच्या मृत्यूनंतर
ज्या व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे ती जिवंत आहे आणि तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे महिलेने पती समजून दुसऱ्याच व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर आत्महत्या केली.

ओडिशातील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात एसी कॉम्प्रेसरच्या स्फोटात भाजलेल्या जखमांमुळे मृत घोषित करण्यात आलेला एक व्यक्ती जिवंत सापडला असून त्याच्यावर त्याच वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मृत घोषित झाल्याची बातमी पत्नीला सहन न झाल्याने तिने गळफास लावून आत्महत्या केली. आता पत्नीच्या मृत्यूनंतर अचानक हॉस्पिटलने पती जिवंत असल्याची माहिती दिली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे  कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. दुसरीकडे, अंत्यसंस्कार झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक मृतदेह परत मागत आहेत. एसीच्या स्फोटानंतर पीडितांचे चेहरे ओळखता येत नसल्याने गोंधळ निर्माण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

दिलीप राय (34) असे अपघातात जखमी झालेल्या पतीचे नाव असून तो कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. 29 डिसेंबर रोजी एका खाजगी रुग्णालयाच्या छतावरील एअर कंडिशनरमध्ये गॅस भरत असताना मोठा स्फोट झाला. त्यात दिलीप राय आणि ज्योती रंजन मल्लिक यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना हायटेक रुग्णालयात दाखल करण्यात आले. चौघांपैकी दोघांचा भाजल्याने मृत्यू झाला तर इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. भाजल्यामुळे चौघांचेही चेहरे ओळखू येत नव्हते.

सुरुवातीला दोन मृतांपैकी एकाचे नाव दिलीप राय असे असल्याचे सांगून त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दिलीपच्या पत्नीने पतीच्या निधनाच्या धक्क्याने आत्महत्या केली. मात्र, गुरुवारी संध्याकाळी उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्याने डॉक्टरांशी संवाद साधताना आपण दिलीप राय असल्याचे सांगितले.

रुग्णालयाच्या प्रमुख स्मिता पाधी म्हणाल्या की, 'या घटनेत जखमी झालेले चार जण हे हॉस्पिटलचे नियमित कर्मचारी नसून ते बाहेरच्या एजन्सीचे कर्मचारी होते. स्फोटानंतर एजन्सीच्या एका कर्मचाऱ्याने त्यांना ओळखले, ज्याच्या आधारे आम्ही रेकॉर्ड केले आणि पीडितांच्या नातेवाईकांनीही त्यांची ओळख पटवली होती. दिलीप राय नावाच्या व्यक्तीचा 30 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि प्रोटोकॉलनुसार आम्ही पोलिसांना कळवले आणि त्याच्या कुटुंबीयांनीही संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.'

दरम्यान, आता अंत्यसंस्कार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी त्याच्या मृतदेहाची मागणी केली आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने त्याचे पार्थिव राय यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दुसरीकडे, वरिष्ठ दर्जाचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करतील, अशी माहिती भुवनेश्वर पोलिसांनी दिली आहे.