बालासोरहून जखमींना घेऊन निघालेल्या बसचा अपघात; रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा येथील तिहेरी रेल्वे अपघातस्थळाची पाहणी करून मदत आणि कामांचा आढावा घेतला. त्यांनी आरोग्य सचिवांना घटनास्थळी बोलावून निर्देश दिले आहेत

आकाश नेटके | Updated: Jun 3, 2023, 06:53 PM IST
बालासोरहून जखमींना घेऊन निघालेल्या बसचा अपघात; रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता title=
(फोटो सौजन्य - PTI)

Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या अपघातातील मृतांची संख्या आता 288 वर पोहोचली आहे. देशातील सर्वात भीषण रेल्वे अपघातांपैकी एक असलेल्या या अपघातात सुमारे 747 प्रवासी जखमी झाले आहेत. बालासोर दुर्घटनेनंतर अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्याचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील घटनास्थळी जाऊन अपघात स्थळाची पाहणी केली. अनेक जखमींना घटनास्थळावरून रुग्णालयात नेण्याचे काम अजूनही सुरू आहे. मात्र जखमींना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बालासोरहून जखमी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला पश्चिम मेदिनीपूरमध्ये अपघात झाला. जखमी प्रवाशांना घेऊन ही बस पश्चिम मेदिनीपूरमधली रुग्णालयात जात होती. त्याचवेळी हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग 60 वर मेदिनीपूरजवळ हा अपघात घडला. पिकअप व्हॅन आणि बस यांची समोरासमोर धडक झाल्याने अनेकांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवण्याचे काम सुरू केले आहे. 

तर दुसरीकडे, क्रेन आणि बुलडोझरच्या सहाय्याने शुक्रवारी जमिनीत अडकलेली बोगी बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा शेवटचा डबा आहे ज्यापर्यंत बचावकर्ते अद्याप पोहोचलेले नाहीत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वेच्या या डब्यावर दुसरा रेल्वेचा डबा आदळल्याने तो गाडला गेला आहे. तो बाहेर काढल्यानंतर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

दोषींना कठोर शिक्षा होईल - पंतप्रधान मोदी

"जीव गमावलेल्या लोकांसाठी हे खूप वेदनादायक होते. जे जखमी झाले आहेत त्यांच्या आरोग्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. ही एक गंभीर घटना आहे. प्रत्येक प्रकारची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जो कोणी दोषी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, घटनास्थळावरुन पंतप्रधान मोदींनी थेट कॅबिनेट सचिव आणि आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी मोबाईल फोनवरून संवाद साधला. लोकांना चांगले उपचार मिळावे यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. पंतप्रधानांसोबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानही होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना परिस्थितीची माहिती दिली. सामान्य रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी अपघातस्थळी सुरू करण्यात आलेल्या  कामाचीही मोदींनी माहिती घेतली.