ऑपरेशन ऑल आऊट; २०१७ साली सर्वाधिक दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू - काश्मीरमध्ये सुरक्षादलाकडून चालवण्यात येणाऱ्या 'ऑपरेशन ऑल आऊट'मध्ये यंदाच्या वर्षात सर्वाधिक म्हणजे तब्बल २०३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. 

Updated: Dec 19, 2017, 07:27 PM IST
ऑपरेशन ऑल आऊट; २०१७ साली सर्वाधिक दहशतवाद्यांचा खात्मा title=

नवी दिल्ली : जम्मू - काश्मीरमध्ये सुरक्षादलाकडून चालवण्यात येणाऱ्या 'ऑपरेशन ऑल आऊट'मध्ये यंदाच्या वर्षात सर्वाधिक म्हणजे तब्बल २०३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. 
दहशतवाद्यांचा शेवट...

उल्लेखनीय म्हणजे, गेल्या तीन वर्षांत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. गृह मंत्रालयाकडून लोकसभेत लिखित स्वरुपात ही माहिती देण्यात आलीय.

गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, जम्मू - काश्मीरमध्ये १० डिसेंबरपर्यंत २०३ दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी ठार केलं. २०१६ साली हाच आकडा १४८ होता... तर २०१५ साली १०८ दहशतवादी ठार करण्यात आले होते. 

दहशतवादी कारवायांचा आकडा

दहशतवाद्यांचा खात्म्याचा जसा आकडा वाढलाय तशीच वाढ दहशतवादी हल्ल्यांमध्येही झालीय. २०१७ मध्ये १० डिसेंबरपर्यंत ३३५ दहशतवादी कारवाया उघड झाल्या तर २०१६ मध्ये १० डिसेंबरपर्यंत ३०८ दहशवादी घटना घडल्या होत्या.

शहिदांचा आकडा

गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, २०१७ मध्ये दहशतवाद्यांविरुद्ध चालवलेल्या ऑपरेशनमध्ये ७५ जवान शहीद झाले... तर याच वर्षी जवळपास ३७ सामान्य नागरिकांना आपल्या प्राणास मुकावं लागलं.

शस्रसंधीचं उल्लंघन

'एलओसी'वर १० डिसेंबरपर्यंत ७७१ वेळा पाकिस्तानकडून शस्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं... तर इंटरनॅशनल बॉर्डरवर यावर्षात नोव्हेंबरपर्यंत ११० वेळा शस्रसंधीचं पाकिस्ताननं उल्लंघन केलंय.