परिस्थिती अवघड असली तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम- मोदी

सध्या भारत आर्थिक आणि सामाजिक पातळीवर संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे.

Updated: Mar 7, 2020, 10:28 AM IST
परिस्थिती अवघड असली तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम- मोदी title=

नवी दिल्ली: जागतिक अर्थव्यवस्था सध्या अवघड परिस्थितीत सापडली आहे. मात्र, भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम असून केंद्र सरकारची आर्थिक धोरणे अत्यंत सुस्पष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते शुक्रवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक व्यापारी परिषदेत बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, सध्या भारत आर्थिक आणि सामाजिक पातळीवर संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग झाला आहे. परंतु, सध्या विविध कारणांमुळे जागतिक अर्थव्यवस्था अवघड परिस्थितीशी सामना करत आहे, असे मोदींनी सांगितले. 

मोदींच्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली- राहुल गांधी

या सगळ्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कमीतकमी परिणाम व्हावा, यासाठी आम्ही अनेक पावले उचलली आहेत. आम्ही पुढाकार घेऊन काही उपाययोजना केल्या आहेत. त्याचे सकारात्मक परिणामही दिसत आहेत. आमची धोरणे अत्यंत सुस्पष्ट आहेत. यापूर्वी विशिष्ट घटकांच्या मर्जीनुसारच साऱ्या गोष्टी चालत असत. त्यांचे मत हे अंतिम असे. मात्र, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे समाजातील प्रत्येक घटकाचे मत विचारात घेऊ जाऊ लागल्याचे मोदींनी सांगितले. 

'सरकारला अर्थव्यवस्थेपेक्षा राजकीय आणि सामाजिक अजेंडा पूर्ण करण्यातच अधिक रस'

यावेळी मोदींनी नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भातही (CAA) भाष्य केले. आजपर्यंत जे लोक जगातील निर्वासितांच्या हक्कांची भाषा करत होते, तेच लोक आता CAA ला विरोध करत आहेत. ज्यांच्याकडून नेहमी संविधानाचे दाखले दिले जात होते, तेच लोक काश्मीरमध्ये संविधानाच्या अंमलबाजवणीला विरोध करत असल्याचा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.