पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे दिल्लीत निधन

पालघर मतदारसंघाचे खासदार अॅड. चिंतामण वनगांचे आज दिल्लीत निधन झालंय.

Updated: Jan 30, 2018, 02:18 PM IST
पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे दिल्लीत निधन  title=

नवी दिल्ली : पालघर मतदारसंघाचे खासदार अॅड. चिंतामण वनगांचे आज दिल्लीत निधन झालं. ते ६७ वर्षाचे होते. 

आज सकाळी वनगा यांच्या छातीत दुखु लागल्यानं त्यांना दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

आदिवासी समाजाचा नेता 

वनगांनी आयुष्यभर आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी काम केलं. आदिवासी परिसरात भाजपचे मतदार वाढवण्यात वनगांचा मोठा वाटा होता.

विविध प्रकल्प तडीला नेण्यात वनगांची मोठी भूमिका बजावलीय. विरार डहाणू लोकल सेवा सुरू करण्यासाठी वनगांनी खूप प्रयत्न केले.

गेल्या काही दिवसांपासून ते डहाणू-नाशिक रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करत होते. ठाणे जिल्हाच्या विभाजनाच्या आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

१९९६, १९९९ आणि २०१४ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली तर २००९ मध्ये विक्रमगडमध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवून आमदारकी मिळवली होती.