'तो' पिझ्झा डिलिव्हरी बॉय 'झोमॅटो'साठीही करत होता काम

केलेल्या कोणाही व्यक्तीच्या संपर्कात आलं नसल्यामुळे.... 

Updated: Apr 16, 2020, 07:27 PM IST
'तो' पिझ्झा डिलिव्हरी बॉय 'झोमॅटो'साठीही करत होता काम title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : Coronavitus कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असतानाच आथा आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्यामुळे अनेकांची चिंता वाढू शकते. नवी दिल्ली येथे एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. ज्यानंतर आता हाच पिझ्झा डिलिव्हरी बॉय झोमॅटो या फूड डिलिव्हरी ऍपसाठीही काम करत असल्याचं अधिकृत वृत्त झोमॅटोकडूनच प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 

दक्षिण दिल्ली प्रशासनाकडून या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं बुधवारी निदर्शनास आणण्यात आलं. मार्च महिन्यापासूनच या व्यक्तीमध्ये कोरोनाची काही लक्षणं दिसून येत आल्याची माहिती आता समोर आली आहे. मुख्य म्हणजे कोणताही प्रवास केला नसल्यामुळे आणि प्रवास केलेल्या कोणाही व्यक्तीच्या संपर्कात आलं नसल्यामुळे त्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष करत काम करणं सुरुच ठेवलं होतं. 

आता मात्र या व्यक्तीने झोमॅटोसाठीही काम केल्याचं लक्षात येताच सावधगिरीचा इशारा म्हणून झोमॅटोकडूनही एक ट्विट करत सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. 'कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या त्या व्यक्तीने आमच्यासाठीही फूड डिलिव्हरी पोहोचवली होती याची आम्हाला आताच माहिती मिळाली आहे. दिल्लीतील मालविय नगर येथे त्याने ही डिलिव्हरी केल्याचं कळत आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या ग्राहकांनी तातडीने सरकारशी संपर्क साधला आहे. हॉटेलकडून देण्यात आलेल्या या ऑर्डर झोमॅटो या ऍपवरुन करण्यात आल्या होत्या. मुळात त्यावेळी त्याला कोरोनाची लागण झाली होती की नाही याविषयी आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती नाही', असं या ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कोणालाही होऊ शकतो ही बाब लक्षात घेत आपल्या वतीने ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. या सर्व प्रकारामुळे दिल्लीत कोरोनाचा धोका आणखी वाढल्याचं स्पष्ट होत आहे. 

 

दरम्यान, या पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर तब्बल ७० ग्राहकांना क्वारंटाइन करण्यात आलं. त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कोणतीही लक्षण आढळऊन आल्यासच त्यांची चाचणी केली जाणार असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे.