'दिशाभूल करणारा प्रचार हा कूटनीति आणि खंबीर नेतृत्त्वाला पर्याय ठरु शकत नाही'

आपला देश आज इतिहासाच्या नाजूक टप्प्यावर उभा आहे. आपल्या सरकारने आज घेतलेले निर्णय आणि पावले भावी पिढ्या आपले आकलन कशाप्रकारे करतील, हे निश्चित करतील. 

Updated: Jun 22, 2020, 10:07 AM IST
'दिशाभूल करणारा प्रचार हा कूटनीति आणि खंबीर नेतृत्त्वाला पर्याय ठरु शकत नाही' title=

नवी दिल्ली: लडाखच्या गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला उद्देशून एक पत्र लिहले आहे. दिशाभूल करणारा प्रचार हा कधीही कूटनीति आणि खंबीर नेतृत्त्वाला पर्याय ठरु शकत नाही. तसेच पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे चीनच्या षडयंत्राला खतपाणी घातले जाता कामा नये, असा महत्त्वाचा सल्ला डॉ. मनमोहन सिंग यांनी सरकारला दिला आहे. 

आपला देश आज इतिहासाच्या नाजूक टप्प्यावर उभा आहे. आपल्या सरकारने आज घेतलेले निर्णय आणि पावले भावी पिढ्या आपले आकलन कशाप्रकारे करतील, हे निश्चित करतील. देशाच्या नेतृत्त्व करणाऱ्यांच्या खांद्यावर कर्तव्य पार पाडण्याची मोठी जबाबदारी आहे. आपल्यासारख्या लोकशाही देशात या सगळ्यासाठी पंतप्रधान उत्तरदायी असतात. त्यामुळे आपली वक्तव्य किंवा घोषणांमुळे देशाच्या सामरिक किंवा भूप्रदेशीय हितसंबंधांवर पडणाऱ्या प्रभावाविषयी पंतप्रधानांनी अत्यंत सजग राहिले पाहिजे, असे मनमोहन सिंग यांनी पत्रात म्हटले आहे. 

तसेच सध्याच्या परिस्थितीत सरकारमधील सर्व घटकांनी संकटाचा सामना करण्यासाठी किंवा परिस्थिती आणखी चिघळणार  नाही, यासाठी एकत्रितपणे काम केले पाहिजे. पंतप्रधान आणि केंद्र सरकारने त्यांच्यासमोरील आव्हानांचा सामना करावा. देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांचे बलिदान सार्थ ठरवावे. सरकार यामध्ये कमी पडले तर तो जनमताचा विश्वासघात ठरेल, असेही मनमोहन सिंग यांनी पत्रात नमूद केले आहे. 

याशिवाय, मनमोहन सिंग यांनी भारत-चीन परिस्थितीविषयी मोदी सरकारने पारदर्शी राहावे, असा आग्रह केला आहे. अपप्रचार हा कधीही कूटनीति किंवा खंबीर नेतृत्त्वाला पर्याय ठरू शकत नाही. खुषमस्करी करणाऱ्या सहकाऱ्यांकडून खोट्या गोष्टी पसरवून सत्याची मुस्कटदाबी करणे योग्य नाही, असा सल्लाही मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला दिला आहे.